ग्नानंतर मिस्टरांबरोबर; तसेच त्यानंतर मुलांबरोबर केलेली प्रत्येक सहल अविस्मरणीय आहे आणि राहील. आमच्या लग्नानंतर मी आणि गिरीश चंडीगड, शिमला, कुलू-मनाली इथं फिरायला गेलो. बसमधून दिल्ली दर्शन केलं. चंडीगडच्या मुक्कामात तिथलं सुंदर असं रॉक गार्डन, रोज गार्डन, पिचोला लेक पाहून शिमला आणि नंतर कुलू-मनाली पाहिलं. हिडिंबा मातेचं मंदिर, गोल्फ कोर्ट, अभयारण्य, शिमला करार झालेली जागा, ही सारी ठिकाणी पाहिली.
या प्रवासात जी शहरं आणि गावं पाहिली, ती मनात घर करून राहिली. तिथल्या नद्या, आजूबाजूचा परिसर स्मरणात आहे. सफरचंदासारख्या लाल-गुलाबी गालांची गोबरी मुलं, सतलज, बियास या नद्या, थरारक असा रिव्हर रिफ्टिंगचाअनुभव, वळणावळणाचे, चालकाचं कौशल्य पणाला लावणारे रस्ते, सुंदर निसर्ग आणि या साऱ्यांनी आमच्या सहजीवनाची सुंदर सुरुवात झाली. त्यानंतर लांबचे प्रवास आम्ही आमची मुलं, अर्णव सात वर्षांचा आणि रिद्धी चार वर्षांची झाल्यावर करायला सुरुवात केली.
पहिल्या लांबच्या प्रवाससाठी हैदराबाद निवडलं; कारण एका शहरात दोन-तीन दिवस मुक्काम करून बघण्यासारखी ठिकाणं आणि त्यामुळे कमी असणारा प्रवास. काय पाहायचं, कोणत्या क्रमानं पाहायचं, हे मी आणि श्री गिरीश यांनी मिळून ऑनलाइन नकाशा पाहून ठरवलं. हॉटेलचं बुकिंग; तसेच स्टेशनवरून आणि शहरात फिरताना टॅक्सीचं ऑनलाइन बुकिंग केलं. हुसेन सागर तलावापासून हैदराबाद दर्शनाची सुरुवात झाली. मग दिवसभर रामोजी फिल्म सिटी पाहिली. ही फिल्म सिटी, त्यातले वेगवेगळे शो, संध्याकाळी कार्निव्हलसाठीची सुंदर रोषणाई; सगळंच मुलांनी आनंदानं पाहिलं. सालारजंग आणि निजाम संग्रहालय, बिर्ला मंदिर सायन्स सेंटर, वैविध्यपूर्ण कारचं सुधाकर संग्रहालय, चारमिनार ही ठिकाणं पाहिली. मुलांबरोबरचा हा प्रवास आणि त्यातले फोटो, हा आमच्यासाठी अविस्मरणीय ठेवा आहे.
यंदा आम्ही मैसुरू, कुर्ग, उटी, दोडाबेटा या ठिकाणांना भेट दिली, या वेळी खासगी टॅक्सी केली होती. गाडीवर असणारा चालक हसतमुख, उत्साही आणि माहीतगार असल्यानं छान माहिती मिळाली. मसाल्यांचे, चहाचे, कॉफीचे मळे, उंच निलगिरीची झाडं, बोटॅनिकल गार्डन, तिबेटियन गोल्डन टेम्पल, हत्तींना घातलेली आंघोळ, जंगल सफारी, उटीमधली थंडी हे सारं मुलांबरोबर अनुभवताना खूप मजा आली. महाराष्ट्रातून कर्नाटक, मग तमिळनाडू आणि मग परत महाराष्ट्र असा हा प्रवास झाला
मुलांच्या शाळेच्या डिसेंबरच्या सुट्टीत महाराष्ट्रबाहेरील एखादी सहल करायचं, हे साथरोग आणि इतर काही कारणांमुळे तीन वर्षं शक्य झालं नाही. त्यानंतर गुजरातची सहल केली. या वेळी बुकिंगपासून सगळं आम्हीच केलं. एक दिवस ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा आणि परिसर छान प्रेक्षणीय केला आहे. भव्य दिव्य स्टॅच्यूसह प्राणी, पक्ष्यांचं अभयारण्य, धरणाचं दृश्य, सुंदर बाग अशा सभोवती बऱ्याच गोष्टी विकसित केल्या आहेत. पर्यटकांसाठी सर्व सुविधा अतिशय चांगल्या असल्यानं गर्दी असूनही मोठा परिसर असल्यानं कुठंही गडबड, गोंधळ व गैरसोय जाणवली नाही. अहमदाबादमध्ये सायन्स सेंटर पाहिलं. इथळं मत्स्यालय खूप मोठे आणि छान आहे. पुढं अदलज की वाव, ही अतिशय सुंदर कोरीवकाम असणारी पायऱ्यांची विहीर पाहिली. कांकरिया लेक पाहून पुण्याकडे निघालो. हा प्रवासही अविस्मरणीय आहे
नंतरच्या वर्षी राजस्थानच्या सहलीत पिंक सिटी जयपूर, बिकानेर, गोल्डन सिटी जैसलमेर, ब्लू सिटी जोधपूर, लेक सिटी उदयपूर या शहरांना भेट दिली. प्रत्येक शहराची ओळख असणारा सुंदर राजवाडा, प्रत्येक राजवाड्याचं वैशिष्ट्य हरखून जावं असं. प्रत्येक शहरात असणाऱ्या वेगळ्या रंगांच्या दगडाच्या खाणी आणि राजस्थान म्हणजे, कमी झाडं असणारा प्रदेश या माझ्या समजाला पूर्णपणे छेद देणारी ही सहल ठरली. जैसलमेरला लष्कराचं सुंदर म्युझियम आहे. आपल्या मुलांबरोबर प्रत्येकानं या ठिकाणी आल्यावर इथं भेट द्यावी. भारतीयांसाठी सैनिकांनी केलेल्या बलिदानाच्या जाणीवेनं इथं आल्यावर भारून जायला होतं. तिथली माहिती वाचताना, ऐकताना डोळे पाणावतात. मनोमन या सैनिकांचे आपण आभार मानतो. दूरवर वाळवंट दिसावं, ही मुलांची इच्छा जैसलमेरच्या कॅम्प स्टेमुळे पूर्ण झाली. वाळवंटात मजा आली; पण जशी संध्याकाळ होऊ लागली, तशी वाढणाऱ्या थंडीनं आम्ही हैराण झालो. करणीमाता मंदिरालाही भेट दिली. या पूर्ण मंदिराच्या आवारात सगळीकडे मोठमोठे उंदीर आहेत.
अंबर फोर्ट, जोधपूर फोर्ट, जुनागड, गोल्डन फोर्ट, उमेद भवन पॅलेस, जसवंतसिंह थडा, पटवाओंकी हवेली, जंतर-मंतर, सिटी पॅलेस अशा सर्व अतिशय उत्कृष्टपणे जतन केलेल्या स्थळांच्या भेटीने भरगच्च असलेली सहल खूपच अविस्मरणीय आहे. स्वच्छता आणि पर्यटकांची गौरसोय होणार नाही अशा प्रकारे या ठिकाणांची निगा राखल्यानं छान वाटलं. सहकुटुंब केलेल्या या सहलींनी आम्हाला समृद्ध केलं. या साऱ्या सहलींमध्ये भारतातील राज्यांची वैशिष्ट्ये संस्कृती संपन्नता पाहून मन आनंद आणि अभिमानाने भरून येते आणि प्रत्येक प्रवास अविस्मरणीय होतो.








