राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर शनिवारी सकाळी त्रंबकेश्वर आणि नाशिक येथील गोदाघाट परिसरात प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
अवघ्या दीड वर्षावर नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा दौरा केला. शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि सीमस्त कक्षाचे अधिकारी तसेच नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सिंहस्थ कक्षाचे अधिकारी यांच्यासमवेत पोलिस महासंचालक दाते यांनी आढावा घेतला. या बैठकीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या बंदोबस्तासह विविध प्रकारच्या नियोजनाची माहिती पोलिस महासंचालकांना देण्यात आली. यावेळी दाते यांनी काही सूचना केल्या असून, त्यानुसार येत्या काळात बारकाईने नियोजन केले जाणार आहे. नाशिक आणि ग्रामीण पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त, मनुष्यबळ, येणारे भाविक, पर्वणी स्नानाचे नियोजन, वाहनव्यवस्था, पार्किंगसह अति महत्त्वाच्या व्यक्तींबाबतची सुरक्षा व्यवस्था याबाबतचे नियोजन पीपीटीद्वारे करण्यात आले. बैठकीला नाशिक ग्रामीण आणि नाशिक आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सिंहस्थ कक्षातील अधिकारी उपस्थित होते.








