(टाइम्स वृत्तसंस्था)
नवी दिल्ली, दि. २८ - ‘उत्पादनवाढीला प्रोत्साहन’ हे प्रमुख सूत्र असलेला १९६६-६७चा अर्थसंकल्प नवे अर्थमंत्री सचिन्द्र चौधरी यांनी लोकसभेला सादर केला. या अर्थसंकल्पांत एकूण ११७ कोटी रुपयांची तूट येईल. ती भरून काढण्यासाठी चौधरी यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशी एकूण १०१ कोटी रुपयांची करवाढ सुचविली आहे. करवाढीचा तडाखा मुख्यत्वे, साखर, सिगारेट, डिझेल तेल इत्यादी सामान्यांच्या जीवनाशी निगडित वस्तूंवर पडलेला आहे. करवाढीसह अर्थमंत्र्यांनी ७४०० रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी प्राप्तिकरावर दहा टक्के सरचार्ज बसविण्याचे ठरविले आहे. अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या करसवलतीही घोषित केल्या. प्राप्तिकर भरण्यासाठी अविवाहित व विवाहितांसाठी जी प्राप्तिमर्यादा आहे (अनुक्रमे २००० व ४३००) ती वाढवून २५०० व ४८०० रुपये करण्यात येत आहे.








