यशवंत व्यायामशाळेची जुनी इमारत पाडून तिच्या जागी सात मजली अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, खेळाडूंना आधुनिक साधनसामग्रीसह दर्जेदार प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेची मुदत २०५२ पर्यंत वाढवली असून, शासन दरबारी २० लाख ४६ हजार ३२१ रुपयांची रक्कम नुकतीच व्यायामशाळेने जमा केली आहे.
पूर्वी येथे मलखांब, वेटलिफ्टिंग आणि व्हॉलीबॉल या खेळांची सुविधा होती. आता त्यात बास्केटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, लेडीज जिम, टेबल टेनिस आदी नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मलखांबसाठी १०० बाय ८० फूट आकाराचा स्वतंत्र आणि सुसज्ज हॉल उभारण्यात येणार आहे, जो राज्यातील एकमेव असेल. या व्यायामशाळेने आजवर सात छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू घडवले आहेत.
कृष्णाजी बळवंत महाबळ गुरुजींनी १ मार्च १९१७ मध्ये नाशिक येथे सहकारी त्र्यंबक गोविंद देशपांडे व रंगनाथ कृष्णा यार्दी यांच्या मदतीने यशवंत व्यायामशाळेची स्थापना केली. गोदावरीच्या महापुरामुळे १९५२ मध्ये तेव्हाचा हत्तीखाना रोड म्हणजे सध्याच्या महात्मा गांधी रोडवरील जागेत स्थलांतरित झाली.








