सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर– जळगाव महामार्गवरील लिहाखेडी बसस्थानका जवळ झालेल्या भीषण अपघातात शरद श्यामराव साखळे (वय ३८, रा. लिहाखेडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण लिहाखेडी गावावर शोककळा पसरली आहे.
शुक्रवारी दुपारी सुमारे बाराच्या सुमारास लिहाखेडी येथील महामार्गावरील सिद्धेश्वर जिनिंगजवळ हा अपघात घडला शरद साखळे हे दुचाकीवरून जात असताना गोळेगाव कडून येणाऱ्या कारने त्यांच्या या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेचा आघात इतका भीषण होता की साखळे रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व तीन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबाचा आधार हरपला आहे. शनिवारी त्यांच्यावर लिहाखेडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच भाजप नेते सुरेश बनकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतः गाडी चालवून इतर नागरिकांच्या मदतीने जखमी शरद साखळे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे मानवतेचे दर्शन घडल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.








