शेअर ट्रेडिंगमधून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील एका ६८ वर्षीय वकिलाची १४ कोटी २५ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
या प्रकरणी संबंधित ज्येष्ठ वकिलाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मोबाइल क्रमांकधारक व विविध बँक खातेधारकांविरुद्ध ‘माहिती-तंत्रज्ञान कायद्या’नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही फसवणूक ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत टप्प्याटप्प्याने करण्यात आली. शहरात अशा प्रकारच्या गुंतवणूक फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचेही समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहेत. सायबर चोरट्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी ऑनलाइन माध्यमातून संपर्क साधण्यात आला. शेअर ट्रेडिंगविषयी आकर्षक माहिती देऊन कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमध्ये इतर गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचे स्क्रीनशॉट्स आणि संदेश सातत्याने शेअर केले जात होते. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास बसला. पुढे त्यांना एक लिंक पाठवून विशिष्ट ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.
पैसे काढताना उघडकीस आला प्रकार
गुंतवलेली रक्कम आणि दाखवलेला नफा पाहून तक्रारदारांनी ॲपमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे परत मिळत नव्हते. याबाबत विचारणा केल्यावर ‘टॅक्स’, ‘प्रोसेसिंग फी’, ‘क्लिअरन्स चार्ज’ अशा विविध कारणांसाठी आणखी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. या वेळी तक्रारदारांना संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
गुंतवणूक फसवणुकीत वाढ
शेअर ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सी, ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म यांच्या नावाखाली मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना पुण्यात वाढत आहेत. बनावट ॲप आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विश्वास संपादन करून नागरिकांची कोट्यवधींची लूट केली जात आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संबंधित बँक खात्यांची माहिती, व्यवहारांचे तपशील आणि वापरलेले मोबाईल क्रमांक यांचा माग काढला जात आहे. नागरिकांनी अनोळखी लिंक, ॲप किंवा जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तक्रारदारांनी संबंधित ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यांना विविध बँक खात्यांवर रक्कम जमा करण्यास सांगितले गेले. सुरुवातीला त्यांनी तुलनेने कमी रक्कम गुंतवली. काही दिवसांतच ॲपमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दाखवण्यात आले. ‘दामदुप्पट’ परतावा मिळाल्याची बतावणी करण्यात आली. या आमिषाला बळी पडून तक्रारदारांनी वेळोवेळी मोठ्या रकमा जमा केल्या. अशाप्रकारे एकूण १४ कोटी २५ लाखांहून अधिक रक्कम सायबर चोरट्यांनी उकळली.








