‘लालपरी’ केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींद्वारे एसटी महामंडळाला २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१०व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. ‘एसटी महामंडळाची २५१ आगारे आणि ६१०पेक्षा अधिक बसस्थानके आहेत. सुमारे १२ हजार बसच्या ताफ्याद्वारे दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांची ने-आण केली जाते. बससंख्या वाढल्यानंतर दैनंदिन प्रवासीसंख्या १ कोटीपर्यंत जाईल. अशा व्यापक माध्यमावर जाहिरात देणे उत्पादकांसाठी सुवर्णसंधीच आहे’, असे ते म्हणाले. बसस्थानके, परिसर, सर्व संसाधनांचा वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा आराखडा तयार केला आहे. निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, पाच वर्षांसाठी २५० कोटींहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.








