शहरात धुळवडीत३२ जणांना दुखापत

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईत धुळवडीचा सण उत्साहात साजरा झाला. मात्र, रंगांच्या उत्सवात काही जणांना दुखापत झाली. विविध घटनांमध्ये ३२ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना अस्थिभंगाच्या तक्रारी होत्या, तर काहींनी भांगेचे अतिसेवन केले होते. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले.

शहरात धुळवडीत३२ जणांना दुखापत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबईमध्ये धुळवडीचा सण जल्लोषात साजरा करण्यात आला, मात्र या रंगाच्या सणात बेरंग होण्याच्या काही घटना घडल्या. धुळवडीचा सण साजरा करताना विविध घटनांत ३२ जणांना दुखापत झाली. त्यांना पालिकेच्या तीन रुग्णालयांत दाखल करण्यात आले. काहींना अस्थिभंगाच्या तक्रारी भेडसावल्या, तर काहींना भांगेचे अतिसेवन केल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले.

केईएम रुग्णालयात एकूण आठ जखमींना आणण्यात आले, त्यापैकी पाच ते दहा वयोगटातील चार मुलांचा समावेश होता. त्यातील कोणाच्या पाठीला दुखापत झाली, कुणाच्या डोक्याला मार लागला, एका मुलाच्या शरीरावर पुरळ उठले, तर एका मुलाच्या डोळ्याला दुखापत झाली. तर ५० वर्षीय व्यक्तीला पाण्याने भरलेली पिशवी मारल्याने दुखापत झाली. नायर रुग्णालयातही आठ जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये ११ वर्षीय मुलाचा दात तुटला. इतर प्रौढांपैकी काहींच्या डोक्याला, तर काहींच्या डोळ्याला दुखापत झाली. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले.

पालिकेच्या लो. टिळक रुग्णालयात होळीच्या दिवशी १३ जखमींना आणण्यात आले. एका व्यक्तीला मृतावस्थेत रुग्णालयात आणले होते. भांगेचे अतिसेवन केलेल्या दोन रुग्णांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय हात-पायांना दुखापत झाल्याच्या तक्रारींसह अनेकजण उपचारासाठी दाखल झाले. कूपर रुग्णालयातही चार जखमींना उपचारासाठी आणण्यात आले. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.