‘त्या’ सुरक्षारक्षकांना धडा शिकवा!

महाराष्ट्र टाइम्स

त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला मारहाण झाल्याच्या घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सुरक्षारक्षकांना पोलिसांनी धडा शिकवावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. भाविकाने अमली पदार्थाचे सेवन केले होते हे कसे ठरवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

‘त्या’ सुरक्षारक्षकांना धडा शिकवा!
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला चार ते पाच जणांनी केलेली मारहाण पटलेली नाही. भाविकाने अमली पदार्थाचे सेवन केले होते, हे तुम्ही कसे ठरवणार,’ असा सवाल उपस्थित करत, ‘हा विषय गंभीर असल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा,’ अशी भूमिका कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आहे. ‘भाविक जगभरातून त्र्यंबकेश्वरमध्ये येतात. असे प्रकार वारंवार होणे चुकीचे असून, ज्यांनी हा प्रकार केला त्यांना चांगल्या पद्धतीने पोलिसांनी धडा शिकवावा,’ असे निर्देशही महाजन यांनी दिले.

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला झालेल्या मारहाणीबाबत महाजन यांनी मंगळवारी (दि.३) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. ‘मारहाणीचा प्रकार चौकशीचा भाग आहे. भाविक परराज्यातील होता, तो निघून गेला आहे. त्याने अमली पदार्थ सेवन केले, हे तुम्ही कसे ठरवणार? त्यामुळे पोलिसांनी यात हस्तक्षेप करून मारहाण करणाऱ्याला धडा शिकवायला हवा,’ असा सल्ला त्यांनी दिला. ‘यासंदर्भात देवस्थानाने बैठक घेऊन सुधारणा करायला हव्यात,’ अशा सूचनाही महाजन यांनी केल्या.

‘इराण-इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे विमानसेवा बंद झाल्या असून, अनेक नागरिक अडकले आहेत. ते सर्व सुरक्षित आहेत. त्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करून देणार आहोत. तेथील दूतावासासोबत केंद्र सरकार संपर्कात असून, एक-दोन दिवसांत विमानसेवा सुरळीत झाल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल,’ असा दावाही त्यांनी केला.

‘स्वीकृत’ची नावे दोन दिवसांत

‘मनपात स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपकडे इच्छुकांची रांग आहे. यासंदर्भात योग्य निर्णय घेऊन एक किंवा दोन दिवसांत स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर होतील. सभागृहातील अन्य नियुक्त्याही आठवडाभराच्या आत होतील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंहस्थाचे सुंदर नियोजन केले जात आहे. त्यामुळे नाशिककरांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. त्यानंतर पुढील ३५ ते ४० वर्षं रस्त्यांवर खड्डे पडणार नाही, असे रस्ते तयार करत आहोत. सिंहस्थाच्या कामात कुठेही तडजोड केली जाणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ पाटलांना कुठेही जाऊ द्या’

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशावरही महाजन यांनी भाष्य केले. ‘उन्मेश पाटील यांना आम्ही पक्षातून हाकलले आहे, त्यामुळे कुठेही जावू द्या. ते आणखी बरेच पक्ष फिरतील,’ अशी टीका महाजन यांनी केली.

त्र्यंबकेश्वर : परप्रांतीय भाविकाला येथील मंदिरात सोमवारी (दि.२) झालेल्या मारहाणीचे पडसाद समाज माध्यमांत उमटले आहेत. ही घटना पाहून काही भाविक दर्शन न घेता माघारी परतले, तर काहींनी नियोजन रद्द केल्याचे चित्र होते. पूजा विधी आणि दर्शनासाठी केलेले बुकिंग रद्द करणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी शासकीय सुटी असतानाही भाविकांचा ओघ कमी होता. मंदिराच्या दोनशे रुपये दर्शनबारी तसेच पूर्व दरवाजा दर्शनबारीत शुकशुकाट होता. भाविकाला झालेल्या मारहाणीचे काही विश्वस्तांनी समर्थन केल्याबाबतही नाराजीचा सूर उमटत आहे.