बिष्णोईच्या वकिलाचा सोशल मीडियावरून माग

महाराष्ट्र टाइम्स

दिल्ली पोलिसांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या वकिलावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकाला अटक केली. सोशल मीडियावरील माहितीचा वापर करून हल्लेखोरांनी वकिलाच्या मंदिरात जाण्याच्या वेळांची माहिती मिळवली होती. या प्रकरणात एकाला जयपूर, बँकॉक आणि दुबईला पळून जाण्यापूर्वी थायलंडमधून भारतात पाठवून अटक करण्यात आली. गुन्ह्यासाठी वापरलेली स्कूटर आणि बनावट सिमकार्ड पुरवणाऱ्या दुसऱ्या आरोपीलाही अटक झाली आहे.

attack on lawyer of lawrence bishnoi police arrest two suspects
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा वकील ॲड. दीपक खत्री यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका मुख्य सूत्रधाराला आणि हल्लेखोरांपैकी एकाला अटक केली आहे. हल्लेखोरांना खत्री यांच्या मंदिरात जाण्याच्या वेळेची माहिती सोशल मीडियावरील पोस्टमधून मिळाली होती. या प्रकरणी रोहित सोलंकी (२६) आणि सागर मलिक (२२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सोलंकी हा रोहित गोदारा टोळीचा सदस्य असून तो जयपूर, बँकॉक आणि दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. तर, मलिक याने गुन्ह्यासाठी वापरलेली स्कूटर आणि बनावट सिमकार्ड पुरवले होते.

उत्तर दिल्ली पोलिसांनी तब्बल ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रोहित सोलंकीला अटक केली. सोलंकी हा पूठ कलानचा रहिवासी आहे. तो हल्ल्यानंतर जयपूरला पळाला होता. तिथून तो बँकॉकला गेला आणि पुढे दुबईला पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, थायलंडमधून त्याला भारतात पाठवण्यात आले आणि दिल्लीबाहेरील एका गावातून त्याला पकडण्यात आले.
दुसरीकडे, गुन्हे शाखेने पूठ कलानचाच रहिवासी असलेल्या सागर मलिकला रोहिणी भागातून अटक केली. गुन्ह्यासाठी वापरलेली स्कूटर आणि हल्लेखोरांना बनावट सिमकार्ड उपलब्ध करून देण्याचा आरोप मलिकवर आहे. त्याच्याकडून परदेशी बनावटीची ग्लॉक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. खत्री हे दर मंगळवारी मंदिरात जातात, ही माहिती त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून हल्लेखोरांना मिळाली होती.