धनंजय मुंडेंविरुद्धची तक्रार फेटाळली

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध कृषीमंत्री असताना वस्तूंच्या किमती वाढवून गैरव्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. राज्याच्या लोकायुक्तांनी ही तक्रार तांत्रिक कारणांवरून फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणी निकाल दिला असल्याचे लोकायुक्तांनी नमूद केले. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय तक्रारकर्त्याला उपलब्ध आहे.

धनंजय मुंडेंविरुद्धची तक्रार फेटाळली
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना विविध वस्तूंच्या किमती वाढवून मोठा गैरव्यवहार करण्यात आला’, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली तक्रार राज्याच्या लोकायुक्त ांनी तांत्रिक कारणांवरून फेटाळली आहे. ‘याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वीच निकाल दिलेला असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातच दाद मागण्याचा पर्याय आहे’, असे निरीक्षण नोंदवत लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी ही तक्रार फेटाळली.

‘भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेला निर्णय आपल्यावर बंधनकारक आहे. त्याविषयी आपण अपिलात सुनावणी घेऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला त्याविषयी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध आहे. तसेच लाभाच्या पदाच्या तरतुदीचा विषय हा लोकायुक्तांच्या अखत्यारीत येत नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद १०३अन्वये तो विषय राष्ट्रपतींच्या अखत्यारीत आहे’, अशी कारणे देऊन लोकायुक्तांनी तक्रार फेटाळली.