पुणेकर प्रवासी परतीच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र टाइम्स

दुबईत युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक मराठी पर्यटक अडकले आहेत. पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथील दहा ज्येष्ठ नागरिक दुबईत अडकून पडले आहेत. त्यांचे परतीचे विमान उड्डाण वारंवार पुढे ढकलले जात आहे. प्रवाशांकडील पैसे संपत चालले आहेत आणि हॉटेल बुकिंगही संपले आहे. अबुधाबी प्रशासनाने मोफत निवास आणि भोजनाची सोय केली आहे, मात्र दुबईत तशी सोय नाही. भारत सरकारकडून केवळ चौकशी केली जात आहे.

marathi tourists in dubai in crisis pune travelers awaiting return

युद्धस्थिती गंभीर झाल्याने दुबईमध्ये अनेक मराठी पर्यटक अडकून पडले आहेत. त्यामध्ये पुणे, सांगली व कोल्हापूर येथील दहा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत या प्रवाशांच्या परतीचे मंगळवारचे विमानोड्डाण गुरुवारी (१२ फेब्रुवारी) होणार असले, तरी त्याबाबत अनिश्चितता आहे. चौकशीव्यतिरिक्त सरकारकडून काहीही दिलासा मिळत नसल्याची नाराजी या प्रवाशांनी व्यक्त केली.

पुणे, सांगली व कोल्हापूर येथील दहा ज्येष्ठ नागरिकांचा गट मागील आठवड्यात दुबईला गेला होता. मंगळवारी त्यांचे परतीचे नियोजन होते. मात्र, रविवारपासून संघर्ष चिघळल्याने विमानोड्डाण रद्द होऊन हे प्रवासी तिथेच अडकून पडले आहेत. परतीचा विमान प्रवास वारंवार रिशेड्यूल होत आहे. आमच्याकडील पैसे संपत चालले आहेत. हॉटेलचे बुकिंगही समाप्त झाले आहे. परतीच्या प्रवासाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही, अशी तक्रार हे प्रवासी करीत आहेत.

दरम्यान, अबुधाबीच्या प्रशासनाने प्रवाशांसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था केली आहे. मात्र, दुबईत तशी कोणतीही सुविधा नसल्याने भारतीय प्रवासी हवालदिल झाले आहेत. भारत सरकारकडून फोनद्वारे चौकशी केली आहे. मात्र, त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केलेली नाही, असे एका प्रवाशाने सांगितले.