भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुण्याची हत्या

महाराष्ट्र टाइम्स

विलेपार्ले येथे एका धक्कादायक घटनेत मेहुण्याने आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची हत्या केली. दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला मारहाण सुरू केली असता, तिचा भाऊ सागर गुप्ता मदतीला धावला. दोघांमध्ये झटापट झाली आणि रागाच्या भरात पतीने सागरच्या मानेवर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुण्याची हत्या
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बहिणीला दारूड्या पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना विलेपार्ले येथे घडली. सागर गुप्ता (२४) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बहिणीचा पती आकाश मौर्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरची बहीण ममता हिचा २०२१मध्ये आकाशसोबत विवाह झाला होता. आकाशला दारूचे व्यसन होते. रविवारी रात्री तो घरी आला आणि ममताला जेवण द्यायला सांगितले. तिने जेवण केले नसल्याचे सांगताच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने ममताला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी या ठिकाणी आलेला सागर मध्ये पडला आणि बहिणीची सुटका करू लागला. यामुळे संतापलेल्या आकाशने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये झटापट सुरू असतानाच आकाशने घरातील चाकू घेऊन सागरच्या मानेवर वार केले.

या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला पाहून आकाश पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या सागरला व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.