‘फायदेशीर’ शेअर गुंतवणुकीतून फसवणुकीचे जाळे

महाराष्ट्र टाइम्स

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना गंडा घातला आहे. डोंबिवलीतील एका व्यक्तीला ११ लाखांहून अधिकची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या व्यक्तीसह इतर पाच जणांची एकूण २२ लाख ६१ हजारांची फसवणूक झाली आहे. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. नागरिकांनी अशा फसव्या प्लॅटफॉर्मपासून सावध राहावे.

a total of 22 lakh fraud in dombivli citizens trapped in the share investment web

गुंतवणुकीच्या फसव्या फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असून डोंबिवलीतील एका व्यक्तीला शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अशाच एका फ्लॅटफॉर्मवर ११ लाखांहून जास्त रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून गुन्हेगारांनी या व्यक्तीसह अन्य पाच जणांची २२ लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली पूर्वेकडे राहणारे अजय (तक्रारदाराचे नाव बदलले आहे) नवी मुंबईतील एका कंपनीत नोकरी करतात. त्यांना शेअर ट्रेडिंग संदर्भात काही मेसेज आले. बँकेच्या नावाने एक लिंक देखील आली होती. बँकेकडून ही लिंक आली असावी, या शक्यतेवरून त्यांनी या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक व्हॉट्सॲप ग्रुप उघडला गेला. १०० पेक्षाही जास्त सदस्य असलेल्या या ग्रुपमध्ये शेअर मार्केट आणि ब्लॉक ट्रेडिंगविषयी माहिती देण्यात येत होती. महिनाभरानंतर अजय यांनी शेअर ट्रेडिंगसाठी होकर दर्शवल्यानंतर त्यांना सायबर गुन्हेगार ट्रेडिंगविषयीची वैयक्तिक माहिती देऊ लागले. नंतर अजय यांना एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर गुंतवणुकीचा एक फ्लॅटफॉर्म उघडला गेला. त्यामध्ये केवायसी अपडेटसह अन्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी ११ लाख ६७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर ६७ लाख ४५ हजारांचा नफा दाखवत असल्याने त्यांनी यातील ५० लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पैसे निघाले नाहीत. याबाबत विचारणा केल्यानंतर गुन्हेगारांनी त्यांना कर तसेच कमिशन म्हणून आणखी १६ लाख ८६ हजार रुपये भरा. अन्यथा तुम्हाला तुमचे पैसे काढता येणार नाही, असे सांगितले.

या संपूर्ण प्रकाराविषयी संशय आल्यानंतर अजय यांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाबीचा उलगडा झाला. त्यांनी ऑनलाइन तक्रार केली. नंतर मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर अशाप्रकारे डोंबिवलीतील इतर पाच जणांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. अजय यांच्यासह एकूण सहा जणांना २२ लाख ६१ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. मानपाडा पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.