पर्यटन, तीर्थक्षेत्रांसाठी ४३७.१० कोटी

महाराष्ट्र टाइम्स

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४३७.१० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. विदर्भातील आध्यात्मिक परिपथासाठी ४५.१७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील राम-काल पथासाठीही निधी मंजूर झाला आहे. सिंधुदुर्ग आणि अहमदनगर किल्ल्याच्या विकासासाठीही तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारांची जबाबदारी महत्त्वाची असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

central government approves 43710 crores for tourism and pilgrimage sites

विदर्भातील वाकी, अदासा, धापेवाडा, पारडसिंगा, तेलंगखेडी आणि गिरड या ठिकाणांचा समावेश असलेल्या आध्यात्मिक परिपथासाठी ४५.१७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

राज्यातील विविध पर्यटन व तीर्थक्षेत्रांच्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने ४३७.१० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर क्षेत्राच्या विकासासाठी ४५.४१ आणि नाशिकमधील राम-काल पथासाठी ९९.१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, संत ज्ञानेश्वरांची भूमी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तीर्थस्थळाच्या पर्यटन विकासासाठी केंद्राकडे राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नेवासा तीर्थस्थळाच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना, नेवासा परिसराच्या देखभालीसाठी २०२२-२३मध्ये ६.३५ लाख रुपये, २०२३-२४मध्ये ३.२१ लाख रुपये, २०२४-२५मध्ये २.५९ लाख रुपये आणि २०२६च्या जानेवारीपर्यंत सुमारे तीन लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याचे पर्यटनमंत्री शेखावत यांनी नमूद केले. ‘तीर्थस्थळांचा विकास व देखभाल ही मुख्यतः संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी आहे. पर्यटन मंत्रालय विविध योजनांद्वारे राज्यांना आर्थिक मदत व सहकार्य करत असते’, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यांतील सुमारे १३ पर्यटन व संरक्षित स्मारक स्थळांच्या विकासासाठी केंद्राने विविध योजनांतर्गत अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर क्षेत्राच्या विकासासाठी ४५.४१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. स्वदेश दर्शन-१ योजनेत सिंधुदुर्ग तटीय पर्यटन परिपथ विकासासाठी १९.०६ कोटी तर स्वदेश दर्शन-२अंतर्गत शिवसृष्टी थीम पार्कसाठी ७६.२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय चॅलेंज बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट (सीबीडीडीडी) योजनेत ऐतिहासिक अहमदनगर किल्ल्याच्या विकासासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग येथे आयएनएस गुलदार अंतर्जलीय संग्रहालय, कृत्रिम खडक आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी ४६.९१ कोटी रुपये आणि पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.