त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणचे माजी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी देव वर्मा यांना राज्यपालपदाची शपथ दिली. देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२वे राज्यपाल आहेत.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. १२ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच इतर कुटुंबीय, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पोलिस महासंचालक सदानंद दाते, मुंबईतील विद्यापीठांचे कुलगुरू तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसृत केलेली अधिसूचना वाचून दाखवली.
३१ जुलै २०२४ रोजी जिष्णु देव वर्मा यांची तेलंगणच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. २०१८ ते २०२३ या कालावधीत ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. जिष्णू देव वर्मा यांनी वित्त, ग्रामविकास व ऊर्जा खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असलेले जिष्णू देव वर्मा हे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज संस्थेच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक होते आणि संस्थेच्या ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक होते. ते उत्तम लेखक व कवीदेखील आहेत.





