मंदिर परिसरात सुमारे सव्वाशे कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी मंदिरापासून चारशे मीटर अंतरावर सुमारे ३२ एकर खासगी जागा आहे. त्यापैकी सुमारे साडेदहा एकर जागेवर या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची योजना आहे. रहिवाशांनी स्थलांतरास मान्यता दिल्यास त्यांचे सद्यस्थितीत असलेल्या घरांसारखेच दुसरे घर तेथे बांधून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन तयार करीत आहे. रहिवाशांनी चर्चा करून १५ दिवसांनंतर निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांनी संमती दिल्यास खासगी जागा संपादित करणे, त्या ठिकाणी घरे तसेच सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात येईल. सुमारे १७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सरकारने भीमाशंकरच्या रहिवाशांच्या स्थलांतरांचा निर्णय़ावर शिक्कामोर्तब केल्यास सरकारकडूनच निविदा प्रक्रिया काढली जाईल.
भीमाशंकर मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमुळे कामास अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा कामावर परिणाम होत असल्याने रहिवाशांचे स्थलांतर करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला आहे. त्याबाबत चर्चा करण्यात आली असून १५ दिवसांत रहिवासी निर्णय जाहीर करणार आहेत. स्थलांतराचा निर्णय झाल्यास राज्य सरकारकडे रहिवाशांना पक्की घरे बांधून त्यांच्या पुनर्वसनाचा १७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी पुढील वर्षी लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. तेथे येणारे भाविक हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सातत्याने येत असतात. सुमारे दोन ते तीन लाख भाविक भीमाशंकरला येण्याची शक्यता असल्याने भीमाशंकर विकास आराखड्यानुसार विकासकामे करण्याची काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून मंदिराचा गाभारा तसेच मंदिराच्या सभामंडपाचे नवे बांधकाम करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा आणि आपत्ती सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे हे आराखड्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार, भीमाशंकर मंदिराचा ऐतिहासिक, पौराणिक साचा कायम ठेवत हे जीर्णोद्धार करण्यात येत आहे.
भीमाशंकर मंदिर ाच्या परिसरात सुमारे सव्वाशे कुटुंब राहतात. दाटीवाटीने राहणाऱ्या या रहिवाशांमुळे जीर्णोद्धाराच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. अशाच परिस्थितीत जीर्णोद्धार झाल्यास आणि दर्शनासाठी गर्दी कायम राहिल्यास भाविकांना धोका निर्माण होऊ शकतो. अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तेथील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. भीमाशंकर मंदिर परिसरातील रहिवाशांशी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चर्चा केली. या वेळी मंदिराचे विश्वस्त सुरेश कौदारे आदी उपस्थित होते.






