‘पहिले पंतप्रधान नेहरू यांच्यावर टीका करणारे नेते आता त्यांचीच विधाने उधृत करीत आहेत हे पाहून हसू आले,’ असा टोला लगावून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी मंगळवारी लोकसभेत सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. तर, ‘प्रियांकांना विरोधी पक्षनेत्या केले असते तर त्यांनी चांगले काम केले असते, कारण त्या कमीत कमी संसदेत येऊन ऐकतात व हसतही राहतात,’ असे प्रत्युत्तर संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी दिले.
‘काँग्रेसने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध ज्या पद्धतीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे त्याबद्दल त्यांना पश्चात्ताप होईल,’ असा हल्लाबोल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी चढविला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना ते म्हणाले की, या प्रस्तावाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग सुरू होत आहे हे दुर्दैवी आहे.
रस्तावावरील दहा तासांच्या चर्चेला मंगळवारी सुरुवात झाली. बुधवारी या प्रस्तावावर मतदान होईल. चर्चेच्या पहिल्या दिवशी सत्तारूढ सदस्य व विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमकी झडल्या. चर्चेच्या सुरुवातीलाच ‘एमआयएम’चे असदुद्दिन ओवैसी व तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनी पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेवर आक्षेप घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करताना सांगितले की, विरोधकांनी सांगितलेले नियम सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित आहेत आणि विरोधकांकडून त्यांचा चुकीचा अर्थ लावला जात आहे.
रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सभागृहातील अनुपस्थितीपासून त्यांच्या वक्तव्यांवर जोरदार टीका केली. महंमद जावेद यांनी या प्रस्तावाचे वाचन केले.
संबंधित वृत्त...फ्रंट पेज २






