विद्यापीठात फोल्डेबल मल्टीकलर दिव्याची निर्मिती

महाराष्ट्र टाइम्स

नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी एक अनोखा फोल्डेबल मल्टीकलर एलईडी दिवा तयार केला आहे. हा दिवा आकाराने लहान, वजनाने हलका आणि खिशात मावणारा आहे. यात पिवळा, निळा, पांढरा आणि आरजीबी असे विविध रंग उपलब्ध आहेत. हा दिवा घरगुती वापर, अभ्यास, प्रवास आणि आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या दिव्याला यूके डिझाइनचे नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.

विद्यापीठात फोल्डेबल मल्टीकलर दिव्याची निर्मिती
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील संशोधकांनी फोल्डेबल मल्टीकलर एलईडी दिवा विकसित केला आहे. विभागप्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि संशोधक सिद्धेश्वर नागपुरे तसेच आदित्य जगदाळे यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनास यूके डिझाइनचे नोंदणी प्रमाणपत्रप्राप्त झाले आहे. हा दिवा आधुनिक जीवनशैलीसाठी उपयुक्त, ऊर्जा-कार्यक्षम आणि सहज वाहून नेता येणारा प्रकाश उपाय ठरत आहे.

हा फोल्डेबल एलईडी दिवा आकाराने लहान, वजनाने हलका आणि खिशात मावणारा आहे. त्यामुळे, घरगुती वापरासाठी, अभ्यासासाठी, कॅम्पिंग, प्रवास, कार्यशाळा तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरतो. दिव्यामध्ये पिवळा, निळा, पांढरा आणि आरजीबी असे विविध प्रकाश पर्याय उपलब्ध आहेत. एकाचवेळी फक्त एकच रंग कार्यरत राहतो. त्यामुळे ऊर्जा बचत होते आणि डोळ्यावर ताण येत नाही. या दिव्यातील पांढऱ्या एलईडी प्रकाशाला विशेष महत्त्व आहे. पांढरा एलईडी प्रकाश नैसर्गिक प्रकाशासारखा असल्याने वाचन, लेखन, अभ्यास, घरगुती कामे आणि कार्यालयीन वापरासाठी अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. दीर्घकाळ वापरातही हा प्रकाश डोळ्यावर कमी ताण देतो आणि वस्तूंचे रंग अचूकपणे दिसण्यास मदत करतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा आपातकालीन परिस्थितीत पांढरा एलईडी विश्वासार्ह आणि प्रभावी प्रकाशस्त्रोत ठरतो. पांढरे एलईडी कमी ऊर्जा वापरून अधिक प्रकार देतात. त्यामुळे बॅटरी दीर्घकाळ टिकते.

या दिव्याचा पिवळा एलईडी प्रकाश डासांना कमी आकर्षित करतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी डासांचा त्रास कमी होतो. निळा एलईडी प्रकाश तणाव कमी करून शांतता आणि आराम देण्यास मदत करतो. आरजीबी प्रकाश पार्टी, कार्यक्रम आणि सादरीकरणासाठी हा दिवा उपयुक्त आणि आकर्षक ठरतो.

दिव्यांमध्ये रंगबदल नियंत्रणासाठी विशेष प्रिंटेड सर्किट बोर्ड बसवण्यात आले आहेत. क्लॉथ ट्युब आणि एयर नोझलमुळे दिवा वापरताना गोलाकार होतो व वापरायचा नसल्यास सपाट करून सहज दुमडता येतो. त्यामुळे उष्णता नियंत्रणही प्रभावीपणे होते. या दिव्याला लटकविण्यासाठी हूक आणि मागील बाजूस चुंबक देण्यात आले असून तो भिंत, तंबू, वाहन किंवा धातूच्या पृष्ठभागावर सहज लावता येतो. हा दिवा बॅटरी किंवा रिचार्जेबल प्रणालीवर कार्यरत असून कमी ऊर्जा वापरात दीर्घकाळ प्रकाश देतो.

या दिव्याचे संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या कल्पकतेचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, आयआयएल संचालक डॉ. प्रकाश इटनकर यांनी स्वागत केले आहे.