वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार केल्यास गणेशपेठ, सीताबर्डी, छत्रपती चौक, ऑरेंज सिटी रुग्णालय चौक, एअर पोर्ट चौक हे भाग शहरातील सर्वाधिक प्रदूषित भाग असल्याचे नीरीच्या अभ्यासात समोर आले आहे. नीरीसमोरील सीसीटीव्हीमध्ये लावलेल्या यंत्रणेनुसार २१ जानेवारी रोजी नीरीसमोरील मार्गावर सर्वाधिक प्रदूषण होते. या दिवशी भारत-न्युझीलंड क्रिकेट सामन्यामुळे वाहनांची ये-जा अधिक होती.
शहरी भागातील वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नीरीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित डॅशबोर्ड विकसित केला आहे. या प्रणालीद्वारे शहरातील वाहतूक पद्धती आणि वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषित वायू उत्सर्जनाचे रिअल-टाइम विश्लेषण करता येणार आहे.
नीरीचे डॉ. राहुल व्यवहारे, डॉ. के. व्ही. जॉर्ज, डॉ. जयसिंग राजपूत, अथर्व मलोडे आणि राज सोनारघरे यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. यात रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींचा वापर केला जात आहे. या सीसीटीव्हींशी विशिष्ट एआय यंत्रणा जोडली जाते. या माध्यमातून कॅमेऱ्या समोरून (रस्त्यांवरून) जाणारी वाहने मोजली जातात. याचे दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी, असे विभाजन केले आहे. पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांद्वारे साधारणत: किती प्रदूषण होते, याचे मानक ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे निर्धारित करण्यात आले आहे. यात बीएस-१चे बीएस-६पर्यंतच्या वाहनांचा समावेश असून त्यांचे स्वतंत्र वर्गीकरण केले आहे.
त्यामुळे दिवसभरात कॅमेऱ्यासमोरून जाणाऱ्या एकूण वाहनांची संख्या मोजली जाते. ही प्रक्रिया सतत सुरूच असते. ही प्रणाली बसविलेल्या शहरात एकूण वाहने किती, त्यातील बीएस-१ ते बीएस-६पर्यंतच्या वाहनांचे प्रमाण याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेतली जाईल. अखेर कॅमेऱ्यासमोरून गेलेली एकूण वाहने आणि बीएस-१च्या बीएस-६पर्यंतच्या वाहनांचे प्रमाण आणि त्यांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची सांगड घालून त्या रस्त्यावरील प्रदूषणाचा अंदाज बांधला जातो. यात शहरात विजेवर चालणाऱ्या वाहनांची टक्केवारी वजा केली जाईल. हा अंदाज सुमारे ९३ टक्के बरोबर असल्याचे सिद्ध झाल्याची माहिती डॉ. व्यवहारे यांनी दिली. नीरीने ही यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर नीरीच्या वर्धा मार्गावरील मुख्य द्वारासमोर सीसीटीव्हीशी जोडली आहे.
मनपा, पोलिसांसाठी उपयुक्त
शहरांमधील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांखेरीज स्थानिक स्वराज्य संस्थांवरही आहे. तसेच शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कोणत्या मार्गांवर किती वाहतूक आहे, याचाही रिअल टाइम अंदाज पोलिसांना येईल. त्यामुळे मनपा व वाहतूक पोलिसांसाठी ही सुविधा उपयुक्त असल्याचे मत वेंकटा मोहन यांनी व्यक्त केले.






