कला परीक्षांना आता बोर्डाचा दर्जा

महाराष्ट्र टाइम्स

राज्यातील कला परीक्षांना आता बोर्डाचा दर्जा मिळणार आहे. यामुळे कला शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. जहांगीर आर्ट गॅलरी येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. हे प्रदर्शन ११ ते १६ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

कला परीक्षांना आता बोर्डाचा दर्जा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राज्यातील कलाशिक्षणाला अधिक शैक्षणिक मान्यता देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत कलाक्षेत्रातील पदविका परीक्षांना ‘बोर्ड परीक्षा’चा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २०० हून अधिक कला संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक व प्रशासकीय पातळीवर दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या (कलाकार विभाग) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कला संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील कलाशिक्षणाला संस्थात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असून पदविका परीक्षांना बोर्ड परीक्षेचा दर्जा देण्याचा निर्णय त्याचाच भाग असल्याचे पाटील यांनी सांगितले. ‘या बोर्ड परीक्षांशी राज्यातील २०० पेक्षा अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कलाशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक स्थैर्य मिळेल’, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या परिसरात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आर्ट गॅलरी उभारण्याची योजनाही जाहीर केली. या गॅलरीत संस्थेतील ऐतिहासिक व दुर्मिळ कलाकृतींचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या अभ्यास व संशोधनासाठी विशेष प्रदर्शन विभाग तसेच आधुनिक कलाप्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. आजचा कलाकार केवळ ब्रश आणि कॅनव्हासपुरता मर्यादित राहिलेला नाही. डिजिटल आर्ट, इन्स्टॉलेशन आणि विविध आधुनिक माध्यमांच्या सहाय्याने तो जागतिक स्तरावर संवाद साधत आहे. कलेमध्ये समाजपरिवर्तनाची मोठी ताकद असल्याने ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात ‘वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार’ तसेच विविध राज्य कला पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. कोव्हिड काळात प्रलंबित राहिलेले तीन वर्षांचे पुरस्कार यंदा एकत्रित प्रदान करण्यात आले. शिल्पकला, उपयोजित कला आणि रेखा व रंगकला या विभागांतील ज्येष्ठ कलाकार किशोर ठाकूर, शि. द. फडणीस आणि वासुदेव कामत यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दृश्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकार विलास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन ११ ते १६ मार्च या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.