उलगडले पडद्यामागील विश्व

महाराष्ट्र टाइम्स

जागतिक महिला दिनानिमित्त 'पडद्यामागील ती' या विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. लेखिका मुग्धा गोडबोले, निर्मात्या मंजिरी भावे, वेशभूषाकार पूर्णिमा ओक आणि रंगभूषाकार सानिका गाडगीळ यांनी मनोरंजन क्षेत्रातील बारकावे उलगडले. महिलांमध्ये निर्मितीचे कौशल्य असते, असे भावे यांनी सांगितले. मेकअप म्हणजे केवळ रंगरंगोटी नसून चेहऱ्यातील वैशिष्ट्ये अधोरेखित करणे आहे, असे गाडगीळ म्हणाल्या.

behind the scenes the power and skills of women

‘माणसे सांभाळून घेण्याचे कौशल्य महिलांमध्ये असते. निर्मितीचे युनिट महिला खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे महिला चांगल्या निर्मात्या होऊ शकतात,’ असे मंजिरी भावे यांनी नमूद केले. मालिकांच्या सेटवरील बारकावे उलगडून त्यांनी निर्मिती क्षेत्र उलगडले.

कथा म्हणजे काय, मालिकांची निर्मिती कशी होते, कलाकारांची वेशभूषा कशी उठावदार होते, रंगभूषेचे महत्त्व आणि त्यातून पात्रांमध्ये येणारा जिवंतपणा अशा सामान्य प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना पडद्यामागील नायिकांनी उत्तरे दिली.

लेखन, निर्मिती, वेशभूषा आणि रंगभूषेचे बारकावे नमूद करून, पडद्यामागचे विश्वच जणू त्यांनी उलगडले. मनोरंजन क्षेत्राचा हा पट उलगडण्याचे निमित्त ठरले, ‘पडद्यामागील ती’ हे विशेष संवाद सत्र.

हिंदू महिला सभेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘पडद्यामागील ती’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी ज्योत्स्ना भोळे सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका मुग्धा गोडबोले, निर्मात्या मंजिरी भावे, वेशभूषाकार पूर्णिमा ओक आणि रंगभूषाकार सानिका गाडगीळ यांनी मनमोकळा संवाद साधला. ज्येष्ठ रंगकर्मी शुभांगी दामले यांनी मुलाखतीची गुंफण केली. या वेळी संस्थेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले उपस्थित होत्या.

‘मेकअप म्हणजे रंगरंगोटी नव्हे. चेहऱ्यातील उणिवा झाकत चेहऱ्यातील वैशिष्ट्य अधोरेखित केले जाते. आता हे क्षेत्र प्रगत होत असून, त्यामुळे शरीराला खोटे बॉडी पार्ट लावणे, खोट्या जखमा करणे अशी कामे प्रोस्थेटिक मेकअपमध्ये करण्यात येतात,’ असे गाडगीळ म्हणाल्या. या रंगभूषेची तंत्र उलगडताना दाखविलेले प्रात्यक्षिक सर्वांना चकीत करणारे ठरले.

वेशभूषा साकारतानाचा अनुभव सांगताना ओक म्हणाल्या, ‘एखादी भूमिका कोणते कलाकार साकारणार आहेत, तो काळ कसा असेल, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, त्या वेळचे दागिने कशी होती, अशा विविध बारकाव्यांच्या अभ्यासातून वेशभूषा साकारली जाते.’