मांजरांच्या डोळ्यांच्या अभ्यासातून रोबोटिक्समध्ये क्रांती घडत आहे. त्यांच्या उभट बाहुल्या आणि टॅपेटम ल्युसिडम या थरामुळे अंधारातही स्पष्ट दिसते. या तंत्रज्ञानामुळे रोबोटिक कॅमेऱ्यांची क्षमता वाढेल. दक्षिण कोरियातील संशोधकांनी मांजराच्या डोळ्यांची नक्कल करणारा कॅमेरा तयार केला आहे. यामुळे वस्तू ओळखण्याची क्षमता आणि ऊर्जाक्षमता वाढेल. हे तंत्रज्ञान भविष्यातील बुद्धिमान रोबॉट्ससाठी उपयुक्त ठरेल.
दक्षिण कोरियातील संशोधकांनी मांजरांच्या डोळ्यांच्या रचनेवरून प्रेरणा घेऊन एक नवीन रोबोटिक दृष्टीप्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे रोबोट्सना कमी प्रकाशातही स्पष्ट दिसू शकेल आणि तीव्र प्रकाशात डोळे दिपणार नाहीत. ग्वान्गझू विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेतील यंग मिंग साँग यांच्या नेतृत्वाखालील टीमने मांजरांच्या डोळ्यातील उभट बाहुली आणि 'टॅपेटम ल्युसिडम' नावाच्या थराची नक्कल करून हा कॅमेरा तयार केला आहे. यामुळे रोबोटिक दृष्टीची क्षमता वाढेल आणि भविष्यात बुद्धिमान रोबॉट्सना खास कामांसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल.
मांजरांचे डोळे आणि त्यांची दृष्टी खरंच खूप खास असते. त्यांची 'दृश्यतीक्ष्णता' चांगली असते, ज्यामुळे ते जवळच्या वस्तू अचूक पकडू शकतात. रंगांपेक्षा हालचालींना ते जास्त वेगाने प्रतिसाद देतात. त्यांच्या डोळ्यातील उभट चिरेसारख्या बाहुल्या माणसांच्या तुलनेत १५ पट जास्त विस्तारू शकतात. यामुळे प्रकाशावर त्यांचे उत्तम नियंत्रण राहते. याच मांजरांच्या डोळ्यांच्या रचनेचा अभ्यास करून संशोधकांनी आता रोबोटिक दृष्टीप्रणालीत नवीन बदल घडवले आहेत.या नवीन प्रणालीमध्ये 'कमीतकमी प्रकाशीय विपथन' (ऑप्टिकल ॲपरेशन) आणि 'सुटसुटीत व विस्तृत दृश्यक्षेत्र' यांचा समावेश आहे. मांजरांच्या डोळ्यात जी उभी-लांबट बाहुली असते आणि डोळ्याच्या पडद्यामागे (रेटिनामागे) असलेला 'टॅपेटम ल्युसिडम' नावाचा खास थर, यामुळे मांजरांना अंधारातही स्पष्ट दिसते. हा थर एका आरशासारखा काम करतो. तो प्रकाश परावर्तित करतो, म्हणूनच मांजरांचे डोळे अंधारात चमकतात.
या तंत्रज्ञानामुळे तीव्र प्रकाशात डोळे दिपण्याचा त्रास कमी होईल. तसेच, अगदी कमी प्रकाशातही वस्तू अधिक स्पष्टपणे दिसतील. यामुळे एकभिंग (सिंगल लेन्स) कॅमेऱ्याची कार्यक्षमता वाढेल. परिणामी, रोबोटिक दृष्टीच्या क्षमतेत मोठी प्रगती होईल. भविष्यात जे बुद्धिमान रोबॉट्स तयार होतील, त्यांना खास दृश्यकार्यांसाठी अशाच दृष्टीप्रणालींची गरज भासणार आहे.
दक्षिण कोरियातील ग्वान्गझू विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेतील यंग मिंग साँग यांचे संशोधन प्राण्यांच्या डोळ्यांवर केंद्रित आहे. हे डोळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी पूर्णपणे जुळवून घेणारे असतात. उदाहरणार्थ, माशांच्या डोळ्यातील बाकदार रेटिनामुळे त्यांना मोठे दृश्यक्षेत्र मिळते. तसेच काही पक्ष्यांची दृष्टी खूप तीक्ष्ण असते.
याच अभ्यासातून संशोधकांनी एक खास कॅमेरा तयार केला आहे. या कॅमेऱ्यात मांजराच्या बाहुलीची आणि 'टॅपेटम ल्युसिडम'ची नक्कल केली आहे. संशोधकांचा दावा आहे की, यामुळे पार्श्वभूमीतील अनावश्यक आवाज (पार्श्वध्वनी) कमी होईल. तसेच, वस्तू ओळखण्याची क्षमता वाढेल. मेटल रिफ्लेक्टरचा वापर केल्यामुळे ऊर्जा वाचेल आणि संवेदनक्षमताही वाढेल.