माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विधान परिषदेच्या सभागृहात पुढील आठवड्यात चर्चा करण्यात येईल, अशी घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सातत्याने आवाज उठवला होता. गुरुवारी मुख्यमंत्री मुंबईत नसल्याने पुढील आठवड्यात यावर चर्चा होईल, असे सभापतींनी स्पष्ट केले.
अजितदादा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत शिंदे यांनी २७ फेब्रुवारीला विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्याला आमदार मिटकरी यांनी दुजोरा दिला होता. सभापती राम शिंदे यांनी अल्पकालीन चर्चा घडवून आणण्याचे सूचना दिली होती. सोमवारी, बुधवारीही शिंदे तसेच मिटकरी यांनी आठवण करून दिली. त्यावर सभापती शिंदे यांनी, गुरुवारी मुख्यमंत्री मुंबईत नाहीत, विषय संवेदनशील असल्याने पुरेसा वेळ मिळावा म्हणून यावर पुढील आठवड्यात चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.



