‘पीएमपी’ची प्रतीक्षा होणार कमी

Contributed byश्रीकृष्ण कोल्हे Shrikrishna.Kolhe@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच एक हजार नवीन सीएनजी बस येणार आहेत. या नवीन बसेसमुळे नवे मार्ग सुरू होतील आणि गर्दीच्या मार्गांवर फेऱ्या वाढतील. यामुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा कमी करावी लागेल. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत मिळेल.

‘पीएमपी’ची प्रतीक्षा होणार कमी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच एक हजार नवीन सीएनजी बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. या नवीन बसचे ‘पीएमपी’कडून नियोजन करण्यात आले असून, या नव्या बसमुळे नवे मार्ग सुरू करण्यासह गर्दीच्या मार्गांवरील बसच्या फेऱ्या वाढविणे पीएमपी प्रशासनाला शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांना करावी लागणारी बससाठीची प्रतीक्षा कमी होईल, अशी चिन्हे आहेत.

‘पीएमपी’कडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत सध्या १,८०० बसमार्फत प्रवासी सेवा दिली जाते. काही वर्षांत ‘पीएमपी’च्या ताफ्यात नवीन बस न आल्यामुळे नवीन मार्ग वाढवले नव्हते. मर्यादित बसमुळे अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. शहर वाढत असतानाच, ‘पीएमआरडीए’ हद्दीतही सेवा देण्यास सुरुवात झाल्याने ‘पीएमपी’ला अतिरिक्त बस आवश्यकच होत्या. त्यामुळे दोन्ही महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ने ‘पीएमपी’ला पाचशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, त्यातून एक हजार सीएनजी बस खरेदी केल्या आहेत. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च महिनाअखेरपासून बस ताफ्यात येण्यास सुरुवात होईल. या बसचे नियोजन ‘पीएमपी’कडून करण्यात आले आहे. त्याचा अधिकाधिक प्रवाशांना कसा फायदा होईल, याची दखल घेतल्याचे ‘पीएमपी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पीएमपी’ची प्रतीक्षा होणार कमी

‘पीएमपी’ची प्रतीक्षा होणार कमी

४८० बस नवीन मार्गांवर

‘पीएमपी’ने नवीन बस आल्यानंतर केवळ जुन्या मार्गांचे सक्षमीकरण न करता, शहराच्या विस्तारणाऱ्या भागाचाही विचार केला आहे. ४८० बससाठी नव्या मार्गांची निश्चिती केली जाणार आहे. आतापर्यंत ‘पीएमपी’ची सेवा पोहोचली नाही, अशा भागांमध्ये नव्याने बससेवा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि विशेषतः ‘पीएमआरडीए’ हद्दीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका?

शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर सक्षम सार्वजनिक वाहतूक हाच एकमेव पर्याय आहे. बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे नागरिक खासगी वाहनांऐवजी ‘पीएमपी’ची निवड करतील, असा विश्वास प्रशासनाला आहे. नवीन भागांत सेवा विस्तारल्यामुळे नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

पीएमपी प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार, ताफ्यात येणाऱ्या एकूण एक हजार बसपैकी ५२० बस सध्याच्या अस्तित्वातील ३८१ मार्गांवरच वाढवण्यात येणार आहेत. यामुळे ज्या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, तिथे प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होईल. परिणामी, दर १० ते १५ मिनिटांनी बस उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. सध्या मार्गावर दररोज १,७०० ते १,८०० बस धावतात. त्यात वाढ होणे अपेक्षित आहे.