‘विठो भरला सबाह्य’

Contributed byडॉ. दिलीप शेठ|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भगवद्गीतेने चार वेद आणि सहा शास्त्रांचा समन्वय साधला आहे. आत्मदर्शनासाठी ध्यान, ज्ञान आणि कर्मयोग हे मार्ग सांगितले आहेत. थोर पुरुषांच्या वचनांवर श्रद्धा ठेवून उपासना केल्यास संसारसागर तरता येतो. सर्व भूतमात्रांचा विस्तार एका आत्म्यापासून झाला आहे. सूर्याप्रमाणे आत्मा क्षेत्राला प्रकाशित करतो. हा विचार वृत्तीवर रुजणे महत्त्वाचे आहे. पुढील लेखात गुणत्रयविभागयोगाचा विचार मांडला जाईल.

‘विठो भरला सबाह्य’

वीच्या आरतीत आपण म्हणतो, ‘चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करिता पडलो प्रवाही।।’ ऋग् वेद , यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद. सहा शास्त्रे म्हणजे, गौतम ऋषींचे न्याय, कणादांचे वैशेषिक, कपिल महामुनींचे सांख्य, पातंजल ऋषींचे योग, जैमिनी ऋषींचे पूर्व मीमांसा आणि व्यास मुनींचे उत्तर मीमांसा म्हणजे वेदान्त शास्त्र. नेति नेति... म्हणून वेद मौनावले, भगवंतांचे पूर्ण वर्णन करू शकले नाहीत आणि सर्व शास्त्रांचे एकमत होऊ शकले नाही. भगवान श्रीकृष्णांनी ती किमया भगवद्गीतेत केली. माउली म्हणतात, ‘तया अध्यात्मशास्त्रांसी। जै साचपणाची ये पुसी। तै येइजे जया ठायासी। ते हे गीता।। (१८.१२३४)’ सर्व शास्त्रांना आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी गीताशास्त्र हे ठिकाण आहे. कपिल महामुनींनी सांख्य शास्त्रामध्ये ज्याला पुरुष म्हटले आहे, त्याला वेदान्ती परमात्मा म्हणतात, असे सांगून भगवंतांनी सांख्यशास्त्र आणि वेदान्त यांची जोडणी भगवद्गीतेत केली आहे. भगवद्गीतेची ही समदृष्टी दोन शास्त्रांचा समन्वय करते. लोकमान्य टिळक म्हणतात, ‘प्रकृतिपुरुष या सांख्य संकल्पनेवर गीता नेहमी परमात्मभावाचे टोपण ठेवते.’ या अध्यायात पुढे आत्मदर्शनाच्या तीन साधना भगवंतांनी सांगितल्या. पहिला ध्यानसाधनेचा मार्ग, दुसरा आत्मविषयक शुद्ध ज्ञानविचार आणि तिसरा चित्तशुद्धीद्वारे आत्मदर्शनापर्यंत पोहोचण्याचा कर्मयोग. स्वामी मकरंदनाथ ‘गीतादर्शन’ या ग्रंथात म्हणतात, ‘भगवंतांनी या तीन उपायांबरोबर आणखी एक उपाय सांगितला. जे थोर आहेत, प्राप्तपुरुष आहेत, त्यांची वचने श्रद्धेने श्रवण करून, ती प्रमाण मानून जे त्याप्रमाणे उपासना करतात, तेही मृत्युरूप संसारसागर तरून जातात.’ पुढे भगवंत प्रकृतिपुरुष विवेक सांगताना म्हणतात, ‘सर्व भूतमात्रांचा भिन्नभिन्न विस्तार हा एकापासून म्हणजे आत्म्यापासून, परमात्म्यापासून झाला आहे, हे समजून घ्यावे.’ क्षेत्रक्षेत्रज्ञ आणि प्रकृतिपुरुष विचाराचा समन्वय साधताना भगवंत सूर्याचे उदाहरण देतात. सूर्यामुळे सर्व ब्रह्मांड प्रकाशित होते; त्याप्रमाणे आत्मा क्षेत्रात राहून संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. तुकोबा म्हणतात, ‘चालते शरीर कोणाचीये सत्ते। कोण बोलवीते हरी विण।। देखवी ऐकवी एक नारायण। तयाचे भजन चुको नका।। तुका म्हणे विठो भरला सबाह्य। तया उणे काय चराचरी।।’ हा विचार वृत्तीवर आरूढ होणे महत्त्वाचे आहे. पुढील लेखात गुणत्रयविभागयोगाचा विचार समजून घेऊ.