गॅसची साठेबाजी केल्यास गुन्हे

महाराष्ट्र टाइम्स

पुणे शहरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. नागरिकांनी घाबरू नये. गॅसची साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्या वितरकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आखाती देशांतील युद्धाचा परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध आले आहेत. यामुळे घरगुती गॅसचा अवैध वापर वाढण्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत.

strict action against gas hoarding in pune

पुणे शहरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा असून वितरणही सुरळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू जाऊ नये, असे आवाहन गॅस कंपन्यांकडून करण्यात आले आहे. घरगुती गॅसच्या नोंदणीसाठी (बुकिंग) आता ३० दिवसांचा कालावधी लागत आहे. तरी एका व्यक्तीने दोन सिलिंडरची नोंदणी केली असल्याने दुसरा सिलिंडर त्वरित मिळण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता असून, त्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागेल. परिणामी, नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

‘ घरगुती गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून साठेबाजी अथवा काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरकांविरोधात थेट गुन्हे दाखल करा,’ असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. त्याचे लोण पुण्यापर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक; तसेच हॉटेल व्यावसायिकांना गॅसपुरवठा करण्यावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे हॉटेल, खाणावळ, रेस्टॉरंट; तसेच छोटे- मोठे हातगाडे विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. गॅस, इंधनाचे दर वाढण्याची; तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या कार्यक्षेत्रात; तसेच तालुका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत.

या पार्श्वभूमीवर, शहरासह जिल्ह्यातील काळाबाजार करणाऱ्या गॅसवितरकांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार दक्षता पथकाकडून तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तपासण्यांमध्ये गैरप्रकार अद्याप आढळला नाही. मात्र, गैरप्रकार आढळल्यास त्या वितरकाकंडून गॅस सिलिंडर जप्त करण्याची कारवाई करण्यात याव; तसेच त्या वितरकाविरोधात घरगुती गॅसची साठेबाजी अथवा काळाबाजार केल्याप्रकरणी थेट गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.