कर्जमाफीची घोषणा हा शेतकऱ्यांचा विश्वासघात

महाराष्ट्र टाइम्स

महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारने ३० सप्टेंबर २०२५ची अट घातली आहे. दोन लाखांवरील कर्जाचे काय होणार हा प्रश्न आहे. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी आहे. धान खरेदीचा कोटा वाढवावा अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून पोलिस भरतीत अनियमितता होत आहे.

कर्जमाफीची घोषणा हा शेतकऱ्यांचा विश्वासघात
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

'महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे,' असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केला. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांच्या वर आहे, त्यांना लाभ कसा मिळणार? आधी त्यांनी वरची रक्कम भरावी आणि मग तुम्ही दोन लाख रुपये देणार का? सरकारने ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी विजय वडेट्टीवार यांनी वरील टीका केली. 'विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी होती, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कोणताही उल्लेख नाही. सरकारने हा बोनस जाहीर करावा,' अशी मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली. तसेच धान खरेदीचा कोटा संपल्याने शेतकरी अडचणीत आला असून, त्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे हा कोटा वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, पोलिस भरतीतही अनियमितता होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. बीडमध्ये पोलिस भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, अपात्र तरुणांना तोंडी परीक्षेत जास्त गुण दिल्याचे आरोप झालेले आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक झाली नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यात ७०० कोटींची वसुली करणाऱ्या आणि सीबीआयच्या रडारवर असलेल्या वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग का दिली जात आहे? अशा अधिकाऱ्यांना क्लिनचीट देऊन पाठीशी घालू नका, असे वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात ९१ लाखांच्या बनावट नोटा सापडणे ही राज्याच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा आहे. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी त्यांनी विधानसभेत केली.