मिरची-मसाले महागाईने आणखी ‘तिखट’

महाराष्ट्र टाइम्स

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे मिरची आणि मसाल्यांच्या महागाईने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. लाल मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लवंगी, ब्याडगी, काश्मिरी आणि गंटूर मिरचीच्या दरात प्रतिकिलो १०० ते ३०० रुपये वाढ झाली आहे. जिरे, मिरे, लवंग, दालचिनी, धने, ओवा, जायफळ यांसारख्या मसाल्यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

मिरची-मसाले महागाईने आणखी ‘तिखट’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

उन्हाचा चटका वाढू लागल्याने घरोघरी मिरची, मसाले, तसेच वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारातील आवक कमी झाल्याने लाल मिरचीसह मिरची आणि मसाले तयार करण्यासाठी लागणाऱ्या बहुतांश जिनसांच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी खडा मसाला आणि गरम मसाल्याचे दर सरासरी वीस टक्क्यांनी वाढले आहेत.

आखातातील युद्धामुळे अगोदरच खाद्यतेलाचा भडका उडाला आहे. अशातच यंदा लाल मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणात घरगुती मसाले तयार केले जात आहेत. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झालेला पाऊस, लांबलेला पावसाळा, तसेच काही भागांत कीड व रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे लाल मिरचीचे उत्पादन घटल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीच्या दरात सरासरी १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारात लवंगी मिरचीसह ब्याडगी, काश्मिरी आणि गंटूर अशा विविध प्रकारच्या मिरचीच्या दरात प्रतिकिलो १०० ते ३०० रुपये वाढ झाली आहे.

स्थानिक बाजारपेठेत जिल्ह्यातील काही भागांबरोबरच नंदुरबार, तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येथून मिरचीची आवक होत आहे. दरम्यान, लागवडीच्या काळात काही भागांत अतिवृष्टी, तर त्यानंतर पाण्याची कमतरता जाणवल्याने मसाला पिकांवरही परिणाम झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारातील आवक कमी झाली असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीत दिसून येत आहे. बाजारात लाल मिरचीसह जिरे, मिरे, लवंग, दालचिनी, धने, ओवा, जायफळ आदी मसाल्यांच्याही किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांत घरगुती मसाले तयार करण्याऐवजी तयार मसाल्यांकडे गृहिणींचा कल वाढताना दिसत आहे. अनेक बचतगटांमधील महिलांकडून मसाले पॅकिंग स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. ३० ते २०० रुपयांपर्यंतच्या लहान पॅकमध्ये मसाले विकले जात असून, किरकोळ बाजारात त्यांची चांगली उलाढाल होत आहे. घरगुती व्यवसायाच्या माध्यमातूनही अनेक महिला रेडिमेड मसाले तयार करून विक्री करीत आहेत.