पत्नीस आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर याने बचावाकरिता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
डॉ. जेजूरकर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि. १६) सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तो शहरातूनच ‘पसार’च राहण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याच्या मागावर पथके तैनात केली असून, न्यायालयाच्या आदेशाकडे वैद्यकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. डॉ. जेजूरकर ९ मार्चपासून नाशिक शहरातून पसार असून, त्याच्या अडचणींत वाढ झाली आहे. त्याने पत्नी डॉ. मनीषा जेजूरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. दरम्यान, ६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के.नगर परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा जेजूरकर (वय ४०) यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर रविवारी (दि. ८) त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सन २०२१ पासून डॉ. नीलेश हा पत्नी मनीषाकडे दुर्लक्ष करीत होता. घरातील किरकोळ गोष्टींसह निर्णयाबाबत तो त्रयस्थ महिलेचा सल्ला घेत होता. तिच्या सांगण्यानुसार वागत असल्याने कौटुंबिक विसंवाद वाढला होता. जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभागातील एका महिला डॉक्टरशी डॉ. नीलेश जेजूरकरची जवळीक होती. तो पत्नी मनीषाकडे दुर्लक्ष करून मानसिक त्रास द्यायचा. सततचा मानसिक छळ आणि घरातील कलहामुळे डॉ. मनीषा त्रस्त झाल्या होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. तांत्रिक विश्लेषणाद्वारे डॉ. जेजूरकर याचा माग काढण्यात येत आहे.









