Two Revenue Department Employees Caught Accepting Bribe Of 50 Thousand In Yavatmal
महसूलचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
महाराष्ट्र टाइम्स•
यवतमाळमध्ये महसूल विभागाचे दोन कर्मचारी लाच घेताना पकडले गेले. शेतजमिनीचे मालकीहक्क बदलण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली होती. एसीबीच्या पथकाने कारवाई करत वरिष्ठ लिपिक राहुल कुयटे आणि महसूल सहाय्यक गोपाल मोहाडे यांना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. शेतमालकाकडून लाच मागितल्याचा आरोप आहे.
यवतमाळमध्ये महसूल विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शेती खरेदीचे सौदापत्र झाल्यानंतर मालकी हक्क बदलण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ लिपिक राहुल अरुणराव कुयटे (३८) आणि महसूल सहाय्यक गोपाल महादेव मोहाडे (४४) अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
कळंब तालुक्यातील मेंढला शिवारातील शेतजमिनीचे सौदापत्र पूर्ण झाले होते. त्यानंतर, शेतजमीन भोगवटा वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यासाठी मूळ मालकाने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी मोहाडे याने ७५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्याने सर्व रक्कम कुयटे याला देण्यास सांगितले होते. अखेर ५० हजार रुपयांवर तडजोड झाली होती. याच तडजोडीनुसार लाच स्वीकारताना दोघांना एसीबीने पकडले.