जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्यांच्या विकास प्रकल्पांतर्गत उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करून देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले. अजिंठा टी-पॉइंट ते अजिंठा लेणी पायथा या मार्गावर पर्यटकांसाठी जादा ई बसेस सुरु करा, असे आदेशही त्यांनी दिले.
अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पातील पर्यटनाशी संबंधित समस्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व नोडल अधिकारी निलेश गटणे, प्रादेशिक व्यवस्थापक योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आदी उपस्थित होते.
पापळकर यांनी अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पातील पर्यटन समस्यांचा आढावा घेत स्थानिक प्रशासन व विविध विभागांनी पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा व सुरक्षा देण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
त्यामध्ये प्रमुखतः अजिंठा टी-पॉइंट ते अजिंठा लेणी पायथा या सुमारे चार किमी अंतरासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरू असलेली प्रदूषणमुक्त बस सेवा पर्यटन हंगामात अपुरी पडते. त्यामुळे पर्यटकांना लेणी न पाहताच परत जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने तातडीने अधिक ई-बस सेवा उपलब्ध कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले.
तसेच टी-पॉइंट ते लेणी पायथा या मार्गावरील खराब झालेल्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, तसेच रस्त्यालगत वाढलेल्या झाडांच्या फांद्या वन विभागाने वेळोवेळी छाटाव्यात, पर्यटकांच्या सोयीसाठी अजिंठा टी-पॉइंट शॉपिंग प्लाझा व अजिंठा गेस्ट हाऊस, फर्दापूर येथे सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अजिंठा व्ह्यू पॉइंट, अजिंठा पर्यटक निवास, विहारा उपहारगृह, अजिंठा उपहारगृह लेणी आणि पायथ्याजवळील अजिंठा अभ्यागत केंद्र येथे उन्हाळ्यात पिण्याचे व वापरण्याचे पाणी उपलब्ध राहण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी अजिंठा लेणी परिसरातील पिण्याचे पाणी, वीज व रस्त्यांसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले.
तक्रार करा, कारवाई होईल
काही जण व्हीव्हीआयपी असल्याचे सांगून नियम मोडून प्रवेश मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. तसेच काही विनापरवाना मार्गदर्शक पर्यटकांना चुकीची माहिती देतात. याबाबत तक्रार मिळाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक डॉ. विनय राठोड यांनी बैठकीत स्पष्ट केले.
वेरुण लेणी परिसरातील अतिक्रमण
वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांना हॉकर्सपासून संरक्षण मिळावे, यासाठी पोलिस विभागामार्फत पोलिस चौकी उभारण्यात यावी. तसेच वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिर मार्गावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात यावे, सुलभ वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता जलदगतीने पूर् करा, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.










