राज्य वन्यजीव मंडळाच्या ६ जानेवारीला झालेल्या बैठकीत लोहारडोंगरी खाण प्रकल्पाला काही अटी आणि शर्तींच्या आधारे परवानगीसाठीची शिफारस राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे करण्यात आली होती. याला जनविरोध लक्षात घेता या खाणीला तूर्त स्थगिती देण्यात येत आहे, अशी माहिती महसूल व वनविभागाच्या उपसचिव निकेता पांडे यांनी पत्राद्वारे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांना दिली. मात्र खाणीला स्थगिती नाही तर ती रद्दच करण्यात यावी, अशी भूमिका धोतरे यांनी घेतल्याने आंदोलन अजूनही कायम आहे.
बंडू धोतरे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बंडू धोतरे, प्रा योगेश दुधपचारे, अभय बडकेलवार, किशोर जामदार, अब्दुल जावेद उपस्थित होते. प्रशासनाने खाणीविषयीची भूमिका मांडली. पण, ‘तूर्तास स्थगिती’ हे आश्वासन असू शकत नाही. लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने केलेली शिफारस-परवानगी नाकारण्यात यावी, असे धोतरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी प्रकृतीच्या कारणाने पोलिस विभागाकडून धोतरे यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा गुरुवारी; आठव्या दिवशी रात्री रुग्णालयात भरती करण्यात आले होते. वैद्यकीय उपचारानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शुक्रवारीही त्यांचे आंदोलन कायम होते.









