लोंढे टोळीची ‘कुंडली’ तयार

महाराष्ट्र टाइम्स

सातपूर हद्दीतील गोळीबार आणि हल्ल्यांमध्ये सक्रिय असलेल्या लोंढे टोळीची पोलिसांनी कुंडली तयार केली आहे. टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत तपास अंतिम टप्प्यात आहे. गोळीबार झालेल्या बारचालकाला अटक झाली आहे. जखमी झालेल्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. टोळीच्या अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे आता उलगडत आहेत.

लोंढे टोळीची ‘कुंडली’ तयार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सातपूर हद्दीत गोळीबार, प्राणघातक हल्ले, खंडणी आणि इतर गुन्ह्यांत सक्रिय सहभाग असलेल्या लोंढे टोळीची ‘कुंडली’ पोलिसांनी तयार केली आहे. टोळीविरुद्ध लावण्यात आलेल्या ‘ मोक्का ’चा तपास अंतिम टप्प्यात असून, या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.

एकीकडे गोळीबार झालेल्या बारचालकाला अटक झाली आहे, तर गोळीबारातील जखमी व्यक्तीविरुद्धही एक गुन्हा नोंद असल्याने त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सातपूर पोलिसांच्या हद्दीत आयटीआय सिग्नलजवळील बारमध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेल्या लोंढे टोळीविरुद्ध लावण्यात आलेल्या ‘मोक्का’च्या गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. अंबड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी हे या प्रकरणी तपास करीत असून, ‘रिपाइं’चा जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस, दीपक प्रकाश लोंढे उर्फ नाना, राहुल सत्यविजय गायकवाड यांना पुन्हा ताब्यात घेतले आहे. या तिघांना सोमवार (दि. १६)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, टोळीच्या सर्व गुन्ह्यांची ‘कुंडली’ तयार होत आहे.

बारमध्ये गोळीबार झाल्यानंतर तेथील रक्ताचे डाग पुसण्यासह इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न बारचालक संशयित बिपिन पुरुषोत्तम पटेल व त्याच्या मित्राने केले. तपासात हा ‘ट्विस्ट’ उघड झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना अटक झाली. हे दोघेही सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. गंभीर बाब म्हणजे संशयित शुभम उर्फ भुऱ्या याने पिस्तुलातून वरुण उर्फ गोल्या तिवारी याच्यावर गोळी झाडली होती. त्यामुळे जखमी तिवारी याने तेव्हा फिर्याद न दिल्याने पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत गुन्हा नोंदवला होता. आता दुसरा ‘ट्विस्ट’ समोर आला असून, तेव्हा जखमी झालेला संशयित तिवारी याला अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्याचे कळते. त्यामुळे लोंढे गोळीबारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी अनेकांचे ‘कारनामे’ उघड होत आहेत.