हल्ल्यात श्वासनलिका फाटलेल्या २१ वर्षीय युवकावर मध्यरात्री दीर्घ शस्त्रक्रिया करुन रुग्णास नवजीवन देण्यात आले. रुग्णाच्या पायातील हाडावरील विशिष्ट आवरणाचा वापर करुन श्वासनलिकेची पुनर्बांधणी करण्यात आली. गंभीर दुखापतीमुळे भूल देणे व श्वसनमार्ग सुरक्षित ठेवण्याचे आव्हान पेलत रुग्णाला मृत्युच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी घाटीच्या डॉक्टरांनी शर्थ लढवली.
जालना येथील युवकास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अपघात विभागात २१ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री सव्वाला दाखल करण्यात आले होते. गंभीर इजा होऊन लक्षणीय रक्तस्त्राव झाला होता व श्वासनलिकेचे मोठे नुकसान झाले होते. रुग्णाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कान-नाक-घसा विभागाच्या डॉक्टरांनी घेत मध्यरात्री दोन वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची श्वासनलिका अक्षरश: फाटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे श्वासनलिकेची पुनर्बांधणी करण्याचा त्वरित निर्णय घेत, रुग्णाचा श्वासोच्छ्वास सुरळीत राहावा यासाठी तातडीने मानेच्या समोरच्या भागात शस्त्रक्रियेद्वारे छोटे छिद्र करुन नळी टाकण्यात आली, ज्याला ‘ट्रॅकिओस्टॉमी’ म्हटले जाते.
त्याचवेळी श्वासनलिकेची पुनर्बांधणी करताना नलिकेच्या मजबुतीसाठी रुग्णाच्या पायातील टिबिया हाडावरील ‘पेरिओस्टिअल ग्राफ्ट’चा वापर करण्यात आला. तब्बल साडेतीन तास म्हणजेच पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ही क्लिष्ट शस्त्रक्रिया चालली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर ट्रॉमा आयसीयूमध्ये दहा दिवस उपचार करण्यात आले व प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला वॉर्डात हलवण्यात आले. अपेक्षित सुधारणा झाल्यामुळे त्याला दोन फेब्रुवारी रोजी सुटी देण्यात आली. दुखापत बरी झाल्यानंतर श्वासनलिकेत टाकण्यात आली नळी २७ फेब्रुवारी रोजी काढण्यात आली. रुग्णाची प्रकृती स्थिर असून मानेवरील जखमही भरुन आल्याचे कान-नाक-घसा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ही शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सुनिल देशमुख, सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनाली जटाळे, सहाय्यक प्राध्यापक व पथक प्रमुख डॉ. अदीब हुसेन, वरिष्ठ निवासी डॉ. गिरीजा जालनापूरकर, निवासी डॉ. राहिला शेख, डॉ. उत्कर्ष शहा, डॉ. ऋषिकेश खराडे यांच्या टीमने यशस्वी केली.
गंभीर श्वासनलिका दुखापतीमुळे भूल देणे व श्वसनमार्ग सुरक्षित ठेवणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. ही जबाबदारी भूलतज्ज्ञांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. डॉ. परचंडीकर यांच्या नेतृत्वाखालील भूलतज्ज्ञांच्या टीमने शस्त्रक्रियेदरम्यान सुरक्षित व्यवस्थापन केले. तसेच शस्त्रक्रियेनंतर ट्रॉमा आयसीयूमध्ये रुग्णाला अतिदक्षता उपचार उपलब्ध करून दिले.









