पाडव्यानिमित्त खरेदीसाठी आवतण

महाराष्ट्र टाइम्स

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. बाजारपेठा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज आहेत. गृह, वाहने, सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. या शुभ मुहूर्तावर नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतील अशी अपेक्षा आहे. ठाण्यात गृहखरेदीसाठी विविध गृहप्रकल्पांना भेटी दिल्या जात आहेत. या मुहूर्तावर नव्या प्रकल्पांची घोषणाही केली जाणार आहे.

पाडव्यानिमित्त खरेदीसाठी आवतण
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांच्या स्वागतासाठी विविध बाजारपेठा सजल्या आहेत. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी ऑनलाइन व्यावसायिक व लहानमोठ्या दुकानदारांनी विविध सवलतींचा वर्षाव केला आहे. गृह, वाहने, इलेक्ट्रॉनिक, सोने खरेदीच्या या विशेष मुहूर्ताची संधी साधण्यासाठी ग्राहक गर्दी करतील, अशी आशा व्यापारी व्यक्त करत आहेत.

पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थिती, गॅसटंचाई आणि महागाई अशा समस्या बाजूला सारत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. मुंबईनंतर ठाणे शहरातील गृहखरेदीसाठी सर्वसामान्य विविध गृहप्रकल्पांना भेटी देत असतात. ठाण्यात सर्वच भागात मोठमोठ्या विकासकांचे प्रकल्प सुरू असून या मुहूर्तावर नव्या प्रकल्पांची घोषणाही केली जाणार आहे. घरखरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करताना विकासक विविध सवलती देत प्रकल्पांचे ब्रॅण्डिंग करत आहेत. यामध्ये घराच्या स्टॅम्प ड्युटीवर सवलत, मोफत इंटिरिअर, नजीकच्या शाळेत कुटुंबातील मुलांना 'हमखास प्रवेश' अशा सवलती गृहखरेदी करताना दिल्या जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ शैलेश घोलप यांनी सांगितले.

दरम्यान, घरासह सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. लग्नसराईसाठी दागिने घडवण्याचा मुहूर्त सोने खरेदी करणारे ग्राहक साधतील असा अंदाज आहे. तसेच वाहनांमध्ये दुचाकी वाहनांपासून महागड्या चारचाकी वाहनांची डिलिव्हरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेण्याकडे ग्राहकांचा कल असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षक लकी ड्रॉमधून बक्षीस आणि कुपनद्वारे वाहन सर्व्हिस मोफत अथवा विशेष सवलती देण्यास आम्ही प्राधान्य देत असल्याचे 'वेलॉक्स मोटर्स'चे जय गजरे यांनी स्पष्ट केले.