खंडाळा अपघातात तीन ठार

महाराष्ट्र टाइम्स

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात झाला. एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने तो इनोव्हा कारवर आदळला. या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर वाहनेही एकमेकांवर आदळली. पाच जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी झाला.

खंडाळा अपघातात तीन ठार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने तीव्र उतारावर कंटेनरची इनोव्हा कारला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट येथे कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर हा कंटेनर आणि सिमेंटचा बल्कर या दोन वाहनांच्या मध्ये पुढे जात असलेली कार चेपली गेल्याने हा अपघात झाला. या दरम्यान इतर दोन-तीन वाहने एकमेकांवर आदळली. त्यात झालेल्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू, तर पाच जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास झाला. अंबादास पेटारे (रा. हिंगणे), श्रीकांत जाधव (वय ६३), प्रमोद पवार अशी इनोव्हा कारमधील मृत्युमुखींची नावे आहेत. जखमींमध्ये स्वप्नील भुजबळ (वय ३६), नवनाथ भुजबळ (३२, दोघेही रा. तळेगाव ढमढेरे), अक्षय गायकवाड (३१, रा. शिक्रापूर), भानुदास गायकवाड (२६, रा. चाकण) आणि कंटेनरचालक अवधेश यादव (वय ३७, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.