साडी, हिरवा चुडा अन् चाकू!

महाराष्ट्र टाइम्स

दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर काही विद्यार्थी जल्लोष करण्याऐवजी वेगळ्याच तयारीत होते. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या दप्तरात रोख रक्कम, प्रेमपत्रे, साडी, हिरवा चुडा, चाकू आणि गर्भनिरोधक पाकिटे सापडली. शिक्षकांनी अचानक तपासणी केल्याने हे प्रकार उघडकीस आले. यामुळे किशोरवयीन मुले चुकीच्या मार्गावर जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. पालकांना याबद्दल माहिती देण्यात आली.

साडी, हिरवा चुडा अन्‌ चाकू!
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहरातील दहावीच्या काही परीक्षा केद्रांवर पेपरच्या अखरेच्या दिवशी ‘सेलिब्रेशन मूड’मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात रोख रकमेसह प्रेमपत्रे, नवी साडी, हिरवा चुडा, फायटर, चाकू, भेटवस्तू आणि गर्भनिरोधकांची पाकिटे आढळली आहेत. काही शाळांनी आवारात ठेवलेली दप्तरे अचानक तपासली असता, नको त्या वस्तू सापडल्याने शिक्षकही चक्रावले आहेत. अशा वस्तू सहजपणे विद्यार्थ्यांच्या दप्तरात कशा येतात, पालक त्याबाबत अनभिज्ञ कसे, किशोरवयीन मुले चुकीच्या वळणावर जात आहेत काय, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

दहावीचा अखेरचा पेपर बुधवारी सुरू असताना शहरातील अनेक शाळांतील परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान रोख एक ते पाच हजार रुपये, मुला-मुलींची पत्रे, नवीन कपडे, हिरवा चुडा, सोन्याची बाळी, गर्भनिरोधकाची पाकिटे, मेकअपचे साहित्य, फायटर, चाकू, वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू, अशा वस्तू दप्तरांमध्ये सापडल्या. परीक्षागृहात जाताना, दप्तर बाहेर ठेवण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या जातात. काही केंद्रांवर शिक्षकांनी पुढाकार घेऊन अचानकपणे दप्तरांची तपासणी केली. दप्तरांची अशी झडती घेतली जाईल, याची विद्यार्थ्यांना कल्पना नव्हती. या तपासणीत उघडकीस आलेल्या गोष्टींमुळे परीक्षा संपल्यानंतर सेलिब्रेशनपेक्षाही भलत्याच गोष्टींचे नियोजन काही विद्यार्थी करीत होते हे लक्षात आले.

हिरवा-चुडा, साडी या वस्तू लक्षात घेतल्यास त्याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. फायटर, चाकूसारखी हत्यारे भांडणासाठी वापरली जात असल्याने पेपरनंतर काही विद्यार्थी हाणामारी करण्याच्या तयारीत होते, ही शक्यता नाकारता येत नाही. तसे प्रसंग शहरात काही शाळांच्या आवारात घडले आहेत. प्रेमपत्रे, भेटवस्तू यासह नवीन ड्रेस हेसुद्धा सापडल्याने विद्यार्थी नेमके कोणत्या प्रकारचे सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत होते, असा प्रश्न शिक्षकांनाही पडला. ज्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तू आढळल्या, त्या मुलांच्या पालकांना शाळेत पाचारण करून माहिती देण्यात आली. काही शाळांनी कटकट नको म्हणून पोलिसांपर्यंत जाणेही टाळले. काही मुलांना समुपदेशनाची गरज असल्याचेही अधोरेखित झाले. शिक्षकांच्या अशा पुढाकारामुळे काही मुला-मुलींसोबत होणारे गैरप्रकार निश्चितच टळले आहेत. परंतु आता या मुलांना पालकांनी संवेदनशीलपणे हाताळायला हवे, असा सूर जाणकारांनी लावला.