चालकांची ‘अल्कोटेस्ट’

महाराष्ट्र टाइम्स

पुणे एसटी विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता एसटी चालक आणि वाहकांना कामावर येण्यापूर्वी अल्कोहोल टेस्ट देणे बंधनकारक आहे. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना बस चालवण्याची परवानगी मिळेल. यामुळे मद्यपान करून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण येईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. या तपासणीची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवली जाईल.

चालकांची ‘अल्कोटेस्ट’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे एसटी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता चालक आणि वाहकांना काम सुरू करण्यापूर्वी ‘ अल्कोहोल टेस्ट ’ चाचणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतरच चालकाच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जाणार आहे. त्यामुळे मद्यप्राशन करून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आळा बसण्याबरोबरच प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.

पुणे एसटी विभागातून दररोज आठशेच्या आसपास बस राज्यातील वेगवेगळ्या भागासाठी धावतात. त्यामधून दोन लाख प्रवासी प्रवास करतात. एसची प्रवास सुरक्षित समजला जातो. त्यामुळे प्रवाशांचा एसटीवर विश्वास आहे; पण काही वेळा एसटीचे चालक मद्यपान करून बस चालवत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर एसटीकडून आचानक चालकांची ‘अल्कोहोल टेस्ट’ केली जात होती. यामध्ये दोषी आढळून आल्यास तातडीने कारवाई केली जात होती. आता एसटीने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियम अधिक कडक केले आहेत. चालक आणि वाहक आगारात कामासाठी हजर झाल्यानंतर मशिनद्वारे स्वतःची अल्कोटेस्ट करून घेणार आहेत. त्यांच्या श्वासातील मद्याचे प्रमाण तपासले जाईल. केवळ हजेरी लावली म्हणजे ड्युटी मिळेल, अशी पद्धत आता राहणार नाही. संबंधित कर्मचारी ‘अल्कोहोल टेस्ट’मध्ये ‘पास’ झाल्यानंतरच त्यांना कामावर पाठविले जाणार आहे. तपासणीत मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ ड्युटीवरून दूर केले जाईल. वारंवार अशा प्रकारे दोषी आढळल्यास निलंबनासह सेवा समाप्तीसारखी कठोर कारवाईही होऊ शकते.

दररोज होणाऱ्या ‘अल्कोहोल टेस्ट’मुळे चालक आणि वाहक मद्यप्राशन करून कामावर येण्याचे प्रकार कमी होतील, असा विश्वास एसटी प्रशासनाला आहे. परिणामी बस अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ‘अल्कोहोल टेस्ट’ मशिनद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणीची नोंद डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार असून, प्रत्येक कर्मचाऱ्याची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे. भविष्यात शिस्तभंगाच्या कारवाईसाठी हा डेटा पुरावा म्हणून वापरता येणार आहे.अनेकदा चालकाने मद्यप्राशन केल्याच्या संशयामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असते. मात्र, आता प्रशासनाकडून नियमित तपासणी केली जाणार असल्याने प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.