Womens Contribution To Gdp An Important Message To Support Each Other And Move Forward
एकमेकींना आधार देऊन महिलांनी पुढे जायला हवे
महाराष्ट्र टाइम्स•
पुण्यात महिला उद्योजिका पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महिलांनी एकमेकींना आधार देत पुढे जावे असे आवाहन केले. जी. आर. इंजिनीअरिंगच्या गौरी जोशी आणि निरामय वेलनेसच्या डॉ. अमृता चांदोरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यावसायिक कार्यामध्ये शिष्टाचार या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे: देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) घरामध्ये काम करणाऱ्या महिलांचे योगदान मोजले जात नाही, असे प्रतिपादन खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानातर्फे (युवा) आयोजित महिला उद्योजिका पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. या सोहळ्यात जी. आर. इंजिनीअरिंगच्या संचालिका गौरी जोशी यांना स्वयंसिद्धा पुरस्कार आणि ‘निरामय वेलनेस’च्या संचालिका डॉ. अमृता चांदोरकर यांना युवा उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खासदार कुलकर्णी यांनी सांगितले की, भारतात उद्योग क्षेत्रात वीस टक्के महिला कार्यरत आहेत आणि जीडीपीमध्ये त्यांचे योगदान १७ टक्के आहे. अनेक अडचणींवर मात करून महिला उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण करतात. त्यामुळे महिलांनी एकमेकींना आधार देत पुढे जायला हवे. ‘स्वतःमधील संवेदनशीलतेला आपली ताकद बनवावी,’ असा सल्ला त्यांनी दिला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी आणि दिलीप कुंभोजकर उपस्थित होते.जी. आर. इंजिनीअरिंगच्या गौरी जोशी यांना सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, ‘निरामय वेलनेस’च्या डॉ. अमृता चांदोरकर यांना मनोरमा श्यामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्काराने गौरवण्यात आले. संस्थेच्या माणिक सुपेकर, प्रतिभा संगमनेरकर, डॉ. स्वाती कुलकर्णी, श्रीकांत जोशी, उपेंद्र केळकर आणि मंजूषा वैद्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमात विश्राम कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर ‘व्यावसायिक कार्यामध्ये शिष्टाचार’ या विषयावर डॉ. जयश्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. माणिक सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिभा संगमनेरकर यांनी आभार मानले.