उद्योग-शिक्षण सेतूवर विद्यापीठाचा भर

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई विद्यापीठाने रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी भारतीय उद्योग परिसंघासोबत (सीआयआय) करार केला आहे. विद्यानगरीत 'शिक्षण ते रोजगार (ई२ई) करिअर लाउंज' सुरू होणार आहे. येथे विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण आणि नोकरीसाठी मार्गदर्शन मिळेल. हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनवेल. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढेल आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

उद्योग-शिक्षण सेतूवर विद्यापीठाचा भर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान यांतील दरी कमी करत थेट रोजगाराच्या संधींशी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने भारतीय उद्योग परिसंघासोबत (सीआयआय) ‘शिक्षण ते रोजगार (ई२ई) करिअर लाउंज ’ उभारण्यासाठी सामंजस्य करार केला असून, उद्योग-शिक्षण सेतू अधिक मजबूत करण्यावर विद्यापीठाचा भर आहे.

विद्यानगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक करिअर लाउंजमुळे विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण, नोकरी सहाय्य आणि प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय करिअर सेवा उपक्रमाशी सुसंगत असलेला हा प्रकल्प विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या सामंजस्य करारासाठी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, सीआयआयचे कार्यकारी संचालक सौगत रॉय चौधरी, प्रतिनिधी पृथाजित लाहिरी, दयाल कांगणे, तसेच गरवारे करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक आणि करिअर प्रशिक्षण व प्लेसमेंट कक्षाचे संचालक प्रा. सचिन लबडे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी शिक्षण आणि उद्योग यांचे प्रभावी एकत्रीकरण ही काळाची गरज असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानावर मर्यादित न राहता उद्योगसुसंगत कौशल्ये आणि प्रत्यक्ष अनुभव मिळेल. उद्योगातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि बदलत्या रोजगाराच्या गरजांशी जुळवून घेणे सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

या करिअर लाउंजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञान, विविध उद्योग क्षेत्रे आणि करिअरच्या संधींबाबत अद्ययावत माहिती दिली जाईल. उद्योग तज्ज्ञांच्या सहभागातून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येईल, असे ‘सीआयआय’चे कार्यकारी संचालक सौगत रॉय चौधरी यांनी सांगितले.