रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम

महाराष्ट्र टाइम्स

गुढीपाडव्यापासून शहरात रामनवमी उत्सवाला सुरुवात होत आहे. तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात १९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. बेडेकर गणपती मंदिर आणि संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे १९ ते २६ मार्च या कालावधीत रामनवमी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचे गायन सादर होणार आहे.

रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहरातील विविध मंदिरांमध्ये गुढीपाडव्यापासून (गुरुवार) श्रीराम नवमी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. उत्सवकाळात दररोज अभिषेक, महापूजा, श्रीरामरक्षा पठण, रामायण वाचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

श्री रामजी संस्थान

तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात १९ मार्च ते दोन एप्रिलदरम्यान धार्मिक आणि सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्सवाचे हे २६५ वे वर्ष आहे. गुढीपाडव्याला (१९ मार्च) श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार आहे. दररोज रामायण वाचन, श्रीरामांची महापूजा, आरती, सायंकाळी छबिन्याची मिरवणूक आणि आरती महापूजा होणार आहे. ‘श्रीराम जन्मानिमित्त (२६ मार्च) दर्शन वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन, श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत पं. आनंद भाटे, सानिका कुलकर्णी गायन सेवा रुजू करणार असून, ‘रामगान’ हा विशेष कार्यक्रमही सादर होणार आहे,’ अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी दिली.

बेडेकर गणपती मंदिर

बेडेकर गणपती मंदिर आणि संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे १९ ते २६ मार्च या कालावधीत रामनवमी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. बेडेकर गणपती मंदिराच्या सभागृहात आयोजित महोत्सवाचे हे ३५ वे वर्ष आहे. विदुषी कल्पना झोकरकर यांच्या गायनाने गुरुवारी (१९ मार्च) महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवात विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, पं. शौनक अभिषेकी, पं. भुवनेश कोमकली, पं. संजीव अभ्यंकर, विदुषी देवकी पंडित, पं. रघुनंदन पणशीकर, पं. व्यंकटेश कुमार या दिग्गजांचे गायन होणार आहे. मंजूषा पाटील ‘रामरंग’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत. २६ मार्च रोजी संज्योत केतकर यांचे रामजन्म कीर्तन होणार असल्याचे मंदिराचे प्रमुख गोविंदराव बेडेकर मंजूषा पाटील यांनी सांगितले.