शंभुराजांच्या हौतात्म्याला अभिवादन

महाराष्ट्र टाइम्स

वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त लाखो शंभुभक्तांनी समाधिस्थळावर नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही ठिकाणी उपस्थित राहून मानवंदना दिली. या सोहळ्यात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्यभरातील भक्तांनी शंभूराजांच्या त्यागाला स्मरून कृतज्ञता व्यक्त केली.

शंभुराजांच्या हौतात्म्याला अभिवादन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

देशासाठी आणि धर्मासाठी हसतमुखाने मृत्यूला कवेत घेणारे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा त्याग हा जगाच्या इतिहासातील सर्वांत जाज्वल्य अध्याय आहे, अशा शब्दांत बुधवारी (१८ मार्च) वढू बुद्रुक आणि तुळापूरच्या पावन भूमीत शंभूराजांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. ३३७व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आज राज्यभरातून आलेल्या लाखो शंभुभक्त समाधिस्थळावर नतमस्तक झाले. यंदा प्रथमच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही ठिकाणी उपस्थित राहून मानवंदना दिली.

वढू बुद्रुक येथे सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मूक पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व सरकारी यंत्रणेद्वारे महापूजा झाली. सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मंत्रोपचारात हेलिकॉप्टरद्वारे झालेली भव्य पुष्पवृष्टी. या वेळी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने सशस्त्र मानवंदना देण्यात आली. या वेळी झालेल्या धर्मसभेत आमदार संग्राम जगताप यांना ‘मृत्युंजय’, आमदार महेश लांडगे यांना ‘स्वराज्यरक्षक’, तर ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांना ‘धर्मवीर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला; तसेच संजय मरकड, नीलेश तरस, राजेंद्र तरस, रोहन माळवदकर यांना ‘शंभुसेवा’, तर कुशल सातव यांना ‘शंभुतेज’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

या वेळी झालेल्या धर्मसभेत प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, हभप संग्राम भंडारे, सर्वेश मेहेंदळे, कुशल सातव, श्री क्षेत्र मढीचे सरपंच संजय मरकड यांनी मनोगत व्यक्त केले.

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शंभुराजांच्या वंशज वृषालीराजे भोसले, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार ज्ञानेश्वर कटके, महापौर मंजूषा नागपुरे, माजी उपसभापती रवींद्र कंद, कुस्तीगीर संघाचे संदीप भोंडवे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका कंद, राणी वाळके, वैशाली नागवडे, सुभाष जगताप, युवराज काकडे, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, विठ्ठल जोशी, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि गटविकास अधिकारी शेखर शेलार, वढू बुद्रुकचे प्रशासक कृष्णा आरगडे, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, अंजली शिवले, सारिका शिवले, मिलिंद एकबोटे, सोमनाथ भंडारे, भाऊमहाराज परांडे, तुळापूरच्या प्रशासक ॲड. गुंफा इंगळे, वर्षा शिवले, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे, पोलिस पाटील जयसिंग भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.