नेहमी वकील आणि नागरिकांनी गजबजलेल्या ठाणे सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवला असून, दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी या बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ई-मेल न्यायालयाच्या निबंधक कार्यालयाला आल्याने मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या ई-मेलनंतर न्यायालयाचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक आणि इतर यंत्रणांनी इमारतींची तपासणी केली. मात्र, काहीही संशयास्पद आढळून आले नाही. ही धमकी खोटी असल्याचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
ठाणे न्यायालयातील निबंधक कार्यालयाच्या ईमेलवर सोमवारी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी एक ई-मेल आला. या ईमेलमध्ये ठाणे न्यायालयात बॉम्ब ठेवला असून, दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी स्फोट होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. निबंधक कार्यालयाकडून दुपारी १२.१५ वाजता ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस न्यायालयात दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाच्या नवीन आणि जुन्या अशा दोन्ही इमारती, तसेच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करून तपासणी केली. दोन तासांच्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दुपारी अडीच वाजेपर्यंत तपासणी सुरू होती. बॉम्बबाबत आलेला ई-मेल पंजाबी भाषेत असून, त्यातील माहिती त्रोटक आहे.