मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. विभागात २० ऑक्टोबर दरम्यान २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तर आजघडीला पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या विभागातील ३५३ गावे आणि २३३ वाड्यांना ५६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण परिस्थिती पाहता तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडली, असे चित्र आहे. सुदैवाने विभागातील चार जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत.
अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यात यंदा पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. विभागात पावसाची तूट ३८ टक्क्यांच्या घरात गेली आहे. परिणामी, पाण्याचे स्रोत नसलेल्या भागातील ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागते.उन्हाळा सुरू होताच पाणीप्रश्नाने यंदा डोके वर काढले होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेल्या गावात टप्प्याटप्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागला. पावसाळा सुरू झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जूननंतर देखील टँकरचा आधार घ्यावा लागला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येत घट झाली होती. परंतु त्यानंतर अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
सप्टेंबर अखेर विभागातील १५७ गावे आणि १०३ वाड्यांना २९५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. तर २० ऑक्टोबरच्या दरम्यान विभागात २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. दिवसेंदिवस पाणीटंचाईचे स्वरूप गंभीर होत आहे.
यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील १७२ गावे आणि १८३ वाड्यांना २९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. जिल्ह्यातील ११९ गावे आणि ३४ वाड्यांना मिळून १७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील ४९ गावे आणि १६ वाड्यांना ६८ टँकरद्वारे तर धाराशिव जिल्ह्यातील १३ गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली. यात शासकीय टँकरची संख्या केवळ पाच असून उर्वरित टँकर हे खासगी आहेत. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, ना्ंदेड आणि लातूर ही चार जिल्हे अद्याप तरी टँकरमुक्त आहेत.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन हिंगोली, नांदेड हे दोन जिल्हे वगळून मराठवाड्यातील उर्वरित सहा जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तीन नोव्हेंबरच्या अहवालानुसार, एकूण ९१७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७४, जालना ७५, परभणी १९, बीड १०३, लातूर ३०२, तर धाराशिव जिल्ह्यातील ३४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.