शहर, जिल्ह्यात वसुबारस उत्साहात

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
शहर, जिल्ह्यात वसुबारस उत्साहात
दिवाळीचा पहिला सण म्हणजेच वसुबारस ( गोवत्स द्वादशी ) गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गाय वासरांचे सायंकाळी पूजन करण्यात आले.

दीपोत्सवातील पहिला दिवस हा वसुबारसचा. आश्विन कृष्ण द्वादशीस यादिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी तसेच गुरुद्वादशी असेही म्हणतात.
दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी असे म्हणत वसुबारसचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गाय, वासरू यांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गाईपासून धनप्राप्ती होते. दूध मिळते. त्यामुळे गाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा गोवत्स बारसेचा दिवस होय. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे, अशी माहिती पुरोहित रामकृष्ण बारहाते यांनी दिली.

कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने सिडकोतील एन १ येथील भक्ती गणेश मंदिर परिसरात सामूहिक पद्धतीने ‘वसुबारस’ सण उत्साहात साजरा झाला. गायी, वासरांचे पूजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, अलका कोरडे, अविराज कोरडे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात १२ फूट उंचीची आकर्षक व सजवलेली फायबरची भव्य गाय-वासरू मूर्ती विशेष आकर्षण ठरली. दरम्यान, कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे १५० शेतकरी कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढा किराणा साहित्यांचे किट वाटप केले जाणार असल्याची माहिती विलास कोरडे यांनी या वेळी दिली.

 संबंधित छायाचित्र...९

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते नक्षत्रवाडी येथील आदिनारायण गोशाळेत गोमातेचे व वासराचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी गोशाळेचे व्यवस्थापक घाटे गुरुजी, सतीश निकम, अशोक गायके, शशिकांत निघोटे, कुलकर्णी आदी उपस्थित होते.