पोलिस पथकावर केला हल्ला

Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
attack on police team family of arrested suspects strikes back
शेती विक्रीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून १८ लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. या वेळी संशयितांच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांवरच दगड आणि लाकडी दांड्याने हल्ला केला. या घटनेत पोलिसांनी अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून, सौम्य बळाचा वापर करून संशयितांना ताब्यात घेतले. ही घटना चार नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे गेट क्रमांक ५६ जवळ घडली. ताब्यात घेतलेल्यांची नावे अर्जुन उर्फ बंडू तांडे आणि सोपान तांबे अशी आहेत.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या एका प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाने संशयित अर्जुन उर्फ बंडू सखाराम तांबे याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. बंडू तांबे हा त्याच्या घरी असल्याची माहिती दिली. या माहितीवरून अर्जुन कदम व श्रीकांत काळे यांच्या त्यांचे सहकारी रेल्वे गेट क्रमांक ५६ च्या परिसरात पोहोचले. तांबेच्या घराजवळ पोलिस कर्मचारी आले. त्यांनी अर्जुन तांबे याला त्यांची ओळख दाखवून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. तांबे याने श्रीकांत काळे यांना धक्का दिला. यानंतर लोखंडी टिकाव आणून काळे यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. काळे थोडक्यात वाचले; तर गिते यांनी तांबेच्या हातातून टिकाव हिसकावला. आरडाओरड ऐकून अर्जुनची पत्नी सुरेखा, मुलगा सोपान आणि मुलगी उमा घराबाहेर आले. सोपानच्या हातात लाकडी दांडा, तर सुरेखाच्या हातात दगड होता. सुरेखाने गिते यांच्या दिशेने दगड फेकला. अर्जुनला पकडून ठेवलेल्या गिते यांच्या पाठीवर सोपानने मारले. उमाने महिला पोलिस अंमलदार वैष्णवी जटाळे यांचा हात पिरगळून धक्काबुक्की केली; तसेच नखांनी ओरबाडले.
परिस्थिती लक्षात घेऊन उपनिरीक्षक कदम यांनी वरिष्ठांकडे अतिरिक्त पोलिस मदतीची मागणी केली. काही वेळातच मुकुंदवाडीचे पोलिस निरीक्षक सोनवणे, उपनिरीक्षक पाथरकर यांचे पथक आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कल्याणकर अतिरिक्त कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यानंतरही तांबे कुटुंबीयांचा विरोध सुरूच होता. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करीत अर्जुन आणि सोपान यांना ताब्यात घेतले. या घटनेत अंमलदार श्रीकांत काळे यांच्या पायाला मुका मार लागला असून गळ्याजवळ खरचटले. गिते यांच्या पाठीला मार लागला. यदमळ यांनामार बसला. सपकाळ आणि पोलिस अंमलदार वैष्णवी जटाळे यांनाही जखमा झाल्या. हल्ला करणाऱ्या बंडू तांबे, पत्नी सुरेखा, मुलगा सोपान आणि मुलगी उमा यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.