‘माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा’

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा’
माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, यासह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने गुरुवारी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतला तर एक डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. माथाडी कामगारांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करा, वेतनवाढीचे करार वेळेवर करण्यात यावे यासह अन्य मागण्या या वेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांना देण्यात आले.
कायद्याच्या चौकटीतील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत नसता एक डिसेंबरपासून कामगार उपायुक्त व माथाडी मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण - सत्याग्रह करू, असा इशाराही माथाडी कामगारांनी दिला. या प्रसंगी देविदास किर्तीशाही, प्रवीण सरकटे, जगन भोजने, शेख कलीम, सचिन पगारे, रावसाहेब मावस, सर्जेराव जाधव, फरीद पठाण, अशोक वाघमारे, किशोर मगरे, बाळू हिवाळे आदी उपस्थित होते.