मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) सध्या या ना त्या कारणामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यांत या उद्यानातील गैरप्रकारांना लगाम बसला आहे. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सहाशेपेक्षा अधिक जवान उद्यानात तैनात करण्यात आल्याने रात्रंदिवस गस्त घालण्यात येत असून ड्रग्ज तस्कर, ते सेवन करणाऱ्यांची धरपकड, गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. संपूर्ण नॅशनल पार्कमध्ये सुमारे २३ पॉइंट (चौक्या)मध्ये हे जवान कर्तव्य बजावत असल्याने वन विभाग आणि पोलिस दलावरील ताण कमी झाला आहे.वन विभागातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेकायदा प्रवेश, गावठी दारूच्या भट्ट्या, वन्य प्राण्यांची शिकार, प्रेमी युगलांकडून बेकायदा वसुली, दारू आणि ड्रग्जचे सेवन हे प्रकार वाढले होते. सर्वांत मोठी डोकेदुखी उद्यानामध्ये होणारे अतिक्रमण ही होती. त्यावर उद्यानाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करणे, अतिक्रमण रोखणे, यापूर्वी झालेल्या अतिक्रमणांना हटवून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी उपाययोजना करणे यांसारख्या जबाबदाऱ्या समितीवर सोपवण्यात आल्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले या समितीचे अध्यक्ष असून राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर, माजी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल आणि उद्यानाच्या संचालक अनिता पाटील यांचा समावेश आहे. त्यानुसार उद्यानाच्या संरक्षणासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ६११ जवानांची फौज तैनात करण्यात आली आहे.
उद्यानाच्या विस्तीर्ण परिसरात २४ चौक्यांमध्ये हे जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. नशेसाठी उद्यानाचा आडोसा घेणाऱ्या अनेकांना पकडून या जवानांनी पोलिसांना पकडून दिले आहे. येथे फिरण्यासाठी येणाऱ्या प्रेमी युगुलांना जबरदस्तीने लुबाडण्याचे, त्यांची छेड काढण्याचे प्रकार घडायचे. मात्र पायी चालत आणि वाहनांतून जवानांची कायम गस्त असल्याने या प्रकारांना आळा बसला आहे. संरक्षण भिंत नसल्याने मोठी अडचण होत असली तरी या जवानांनी घुसखोरांच्या चोरवाटा शोधून काढल्या आहेत. उद्यानाची संरक्षित क्षेत्रातील रस्त्याचा वापर शॉर्टकट म्हणून केला जाण्यावरही अंकुश बसला आहे. हत्येच्या तसेच, अन्य गुन्ह्यांमध्ये तपास करताना पोलिसांना या जवानांची मदत झाल्याची उदाहरणे आहेत.
दुर्घटनांना ब्रेक
पिकनिकसाठी येणारी तरुण मुले नदी, खदानीमध्ये पोहण्यासाठी उतरत असल्याने अनेकदा दुर्घटना होत असत. आता तलावाच्या आजूबाजूला जवानांची गस्त असल्याने तरुणांना आत उतरू दिले जात नाही. दहिसर येथील एक तरुणी आत्महत्या करण्यास उद्यानात गेली होती. सतर्क जवानांनी तिला रोखले आणि आत्महत्येपासून परावृत्त केले.