आवक घटल्याने सुकामेव्याचे दर हजारपार!

Contributed by: नवी मुंबई,टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
dry fruit prices surpass thousand a significant blow to diwali preparations
दिवाळीच्या फराळासाठी तसेच भेटवस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जाणाऱ्या सुक्या मेव्याचे दर यंदा वाढले आहेत. बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड यांसह बहुतांश प्रकारांच्या किमती किलोमागे एक हजार रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. परदेशातून होणारी आवक घटल्याने बाजारातील पुरवठा कमी झाला असून, वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. सुक्या मेव्याचा वापर दिवाळीच्या फराळात होत असल्याने तो खर्च वाढला आहे.

गेल्या वर्षी साधारण ६०० ते ८०० रुपये किलो दराने मिळणाऱ्या सुक्या मेव्याच्या किमती यंदा लक्षणीय वाढल्या आहेत. दिवाळीत सुक्या मेव्याचे आकर्षक डबे भेट देण्याची पद्धत वाढल्याने सणासुदीच्या काळात या पदार्थांना मोठी मागणी असते. मात्र, यंदा व्यापाऱ्यांकडे पुरेसा साठा नसल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. परिणामी, बाजारातील दर चढे राहिले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धानंतर काही परदेशी बाजारपेठांतून होणाऱ्या सुक्या मेव्याच्या आयातीवर परिणाम झाला. आता काही प्रमाणात मालाची आवक सुरू झाली असली, तरी ती अपेक्षेइतकी नाही. बदामाची मोठी आवक अमेरिकेतून, तर पिस्त्याची आवक प्रामुख्याने इराणमधून होते. अफगाणिस्तानातून येणारा सुका मेवाही दुबईमार्गे बाजारात पोहोचतो. वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा परिणाम अंतिम किमतींवर होत आहे. त्यामुळे साहजिकच सुका मेव्याचे दर वाढले आहेत.